समाजमाध्यमांतील निकाल आणि जाहीर झालेला निकाल हा योगायोग नसल्याची चर्चा

पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी रात्री उशिरा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संकेतस्थळावरून जाहीर झाला. मात्र, त्यापूर्वीच दोन दिवस हा निकाल समाजमाध्यमांत फिरत होता अशी चर्चा आहे. समाजमाध्यमांत फिरलेल्या निकालातील काही नावे आणि अंतिम निकालातील काही नावे सारखीच असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल सर्वसाधारणपणे पूर्व परीक्षेच्या आधी जाहीर केला जातो. त्यानुसार हा निकाल एप्रिलमध्ये जाहीर होणे अपेक्षित होते. समांतर आरक्षणाच्या मुद्दय़ावरून राज्यसेवा परीक्षेबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात हा अंतिम निकाल अडकला होता. यंदा राज्यसेवा परीक्षेची पूर्व परीक्षाच एप्रिलमध्ये झाली. त्यानंतर मुख्य परीक्षेच्या मुलाखती झाल्या. गेला महिनाभर हा निकाल तयार होता. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे तो जाहीर केला जात नव्हता. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनीही त्याबाबत आरडाओरडा केला होता. त्यानंतर हा निकाल ‘लीक’ झाल्याची चर्चा आहे.

राज्यसेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेत मिळालेले गुण आणि मुलाखतीत अपेक्षित असलेले गुण यांची आकडेवारी मांडून कोणाला कोणते पद मिळू शकते याचा एक ताळेबंद विद्यार्थ्यांकडून मांडला गेला असण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आलेला अंदाज समाजमाध्यमांमध्ये पसरलेला असू शकतो. विद्यार्थ्यांनी अंदाज म्हणून वर्तवलेली नावे आणि प्रत्यक्ष निकालातील नावे हा निव्वळ योगायोग आहे असेही म्हणता येत नाही. मात्र, समाजमाध्यमांमध्ये या निकालाबाबतची चर्चा दोन दिवस सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असला, तरी समांतर आरक्षणाबाबतचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. या निकालात बदलही होऊ शकतो. मात्र, हा बदल न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.