कृषीपंप वगळता महावितरणच्या राज्यातील एक लाख ४२ हजार ग्राहकांनी पैशांचा भरणा करूनही त्यांच्या वीज जोडण्या प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, वीज मीटर मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असतानाही महावितरणच्या चालढकलीमुळे ग्राहकांची प्रतीक्षा कायम आहे

वाढत्या थकबाकीसह वीज चोरी, विजेचा अनधिकृत वापर यामुळे महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे थकबाकी कमी करण्यासाठी राज्यात वसुली अभियान राबवून वीज गळती रोखण्यासाठी मोठी मोहीम सातत्याने राबवण्यात येत आहे.  महावितरणच्या व्यवसायाच्या दृष्टीने वीज मीटर हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सिंगल फेज आणि थ्री फेजच्या मीटरची मोठय़ा प्रमाणावर खरेदी करण्यात आल्याने नवीन वीज मीटरचा तुटवडा नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. सर्वच परिमंडळांना त्यांच्या गरजेनुसार वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही राज्यातील काही शाखा आणि उपविभागीय कार्यालयांकडे मोठय़ा संख्येने मीटरचा साठा असल्याचे प्रलंबित वीज जोडणीच्या यादीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात सध्या एक लाख ४२ हजार ग्राहकांनी पैसे भरूनही त्यांच्या वीज जोडण्या प्रलंबित आहेत. काही ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वीज जोडणी देणे शक्य नसले तरी, अनेक ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असतानाही ग्राहकांना वीज जोडणीसाठी महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. वीज ही मूलभूत गरज असल्याने कुणीही विजेशिवाय राहणे शक्य नसल्याने अनेक महिने विजेसाठी वाट पाहण्याऐवजी अनधिकृतपणे विजेचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी व्यक्त केली आहे.

नवीन वीज जोडणी, नादुरुस्त मीटर बदलणे, मीटर वाचन यासारख्या कामात कमीत कमी मानवी हस्तक्षेप राहण्यासाठी महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असताना काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनच याला हरताळ फासण्याचे काम होताना दिसत आहे.

वसुली ढेपाळली

२०१७-१८ या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या म्हणजे मार्च महिन्यात महावितरणच्या यंत्रणेने दिलेल्या उद्दिष्टानुसार वसुलीचे काम वेगाने केल्यामुळे पाच हजार १५० कोटींचा विक्रमी महसूल जमा करण्यात आला. एप्रिल महिन्यात मात्र ही वसुली ढेपाळली आहे. महावितरणचा दर महिन्याचा खर्च निश्चित असून, तो भागवण्यासाठी तितकी वसुली होणे आवश्यक आहे. विजेच्या वाढत्या मागणीमुळे वीज खरेदीचा खर्चही वाढला आहे. एप्रिल महिन्यात विजेच्या मागणीने उच्चांक गाठला असताना दुसरीकडे वसुली घटल्यामुळे महावितरणच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे.