मुंबई- गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पहाणी शनिवारी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहाणी केली. रखडलेल्या कामाला कंत्राटदाराने ३१ मार्चपुर्वी गती दिली नाही. तर कंत्राटदाराची कंत्राटकाढून घेतले जाईल इशारा त्यांनी  दिला. मात्र कंत्राटदार अकार्यक्षम असून त्याच्या हलगर्जीपणीमुळे अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे त्याची तातडीने हकालपट्टी करा अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली. त्यामुळे ठेकेदाराला मुदतवाढ देण्यावरून सेना-भाजपतील मतभेद यानिमित्ताने समोर आले.
  मुंबई- गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाला २०११ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या रुंदीकरणाचे हे काम २०१४ अखेर पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र भुसंपादनाच्या कामात झालेला उशीर आणि ठेकेदाराची अकार्यक्षमता यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या ठप्प आहे. खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असुन यात अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहे. हे लक्षात घेऊन चंद्रकांत पाटील आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शनिवारी महामार्गाच्या कामाची पहाणी केली.
   कंत्राटदारांची  मुदत संपुष्टात आल्याने काम ठप्प असण्याचे सांगीतले जात होते. आता मात्र कंत्राटदाराला मार्च २०१६ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असून त्यानी तातडीने कामाला सुरूवात केली पाहिजे. कंत्राटदाराला मार्चअखेर पर्यंत तातडीने करावयाच्या ८९ कामांची सुची देण्यात आली असून ती त्याने कुठल्याही परिस्थितीत ३१ मार्च पुर्वी करणे अपेक्षीत आहे. तसेच ३१ मे पुर्वी रस्ता रुंदीकरणाच्या कामात प्रगती झाली नाही तर ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकले जाईल असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
ठेकेदार अकार्यक्षम आहे. त्याच्या हलगर्जीपणामुळे दिवसागणिक अपघातात मृत्यू होत आहेत. कुठल्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाऊ नये
-रामदास कदम, पर्यावरण मंत्री