महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या मुंबईला जगाचा मानबिंदू बनवण्याचे आमचे ध्येय असून त्यासाठी या शहराच्या पायाभूत विकासासाठी तातडीने निर्णय देण्यात येतील, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी, नाताळच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांना आश्वासनांची भेट दिली. मुंबईतील उपनगरी रेल्वेगाडय़ांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यासोबतच शहरात बहुमजली वाहनतळ उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. याशिवाय तीन महिन्यांत शहरात सीसीटीव्ही बसवणे, मेट्रो २ व ३च्या कामाला सुरुवात करणे, अतिक्रमणे रोखण्यासाठी  आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे, अशा अनेक घोषणा मुख्यमंत्र्यांनी बुधवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केल्या.
 मुंबईतील पायाभूत सुविधांसह विविध प्रश्नांवर विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीए, महापालिका व अन्य यंत्रणाकडून उभारल्या जाणाऱ्या पायाभूत प्रकल्पांबाबत माहिती दिली. उपनगरी प्रवाशांचे हाल लक्षात घेऊन गाडय़ांना मेट्रो किंवा मोनो रेल्वेप्रमाणे सरकते दरवाजे बसविण्याचा प्रस्ताव आहे. सुरुवातीला हार्बर मार्गावर प्रायोगिक तत्वावर एका उपनगरी गाडीला हे दरवाजे बसविले जाणार असून ते कितपत उपयुक्त आहे, हे पाहून अन्य सर्व गाडय़ांनाही बसविले जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईत अतिक्रमणाचा विषय गंभीर असून त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उपग्रह छायाचित्रे घेऊन अतिक्रमणे झाल्याचे दिसून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील व ती न हटविल्यास त्याला जबाबदार धरता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईत नागरिकांना सेवा पुरविणाऱ्या विविध यंत्रणांचा समन्वय ठेवण्यासाठी एक यंत्रणा उभारली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. मेट्रोच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याला एमएमआरडीएतर्फे मान्यता देण्यात आली असून त्याचे काम लवकरच सुरू केले जाईल, असे ते म्हणाले.
मुंबईतील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या प्रश्नावर विधानसभेतही चर्चा झाली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले,‘मुंबईत रोज साडेचारशे वाहनांची नोंदणी होते. पार्किंग अल्पप्रमाणात आहे. त्यामुळे रस्त्यावरच पार्किंग केले जाते. मुंबईत आता जागा व रस्ते यात वाढ होणे शक्य नाही. त्यामुळे येथील सिनेमागृहे आणि मॉल्सच्या जागा रात्री पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. याशिवाय मुंबईत अनेक बहुमजली वाहनतळ उभारण्यात येतील.’
अन्य महत्त्वाच्या घोषणा
*समुद्राच्या पूर्व बाजूस सागरी वाहतूक सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे.
*‘झोपु’ योजनेतील गैरप्रकारांची चौकशी.
*शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलणार.