मृतदेह परस्पर जाळला

मुलाने केलेला प्रेमविवाह मान्य न करता सासरच्या मंडळींनी नववधूचा खून करून तिचा मृतदेह घराच्या पाठीमागेच जाळल्याची घटना मोहोळ तालुक्यातील येवती येथे उजेडात आली आहे.

रेखा श्रीकृष्ण लेंडवे (वय १९) असे खून झालेल्या नववधूचे नाव आहे. या प्रकरणी सासू, सासरा व दीर या तिघा जणांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सासरे सुभाष औदुंबर लेंडवे, सासू जनाबाई लेंडवे आणि दीर प्रशांत लेंडवे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मृत रेखा हिचा श्रीकृष्ण लेंडवे याच्याबरोबर प्रेमविवाह झाला होता. श्रीकृष्ण हा रेखाचा नात्याने मावसभाऊ आहे. तीन महिन्यांपूर्वी श्रीकृष्ण याने रेखाला घरी घेऊन जातो, असे सांगून  नेले. नंतर या दोघांनी प्रेमविवाह केला आणि विवाहाची छायाचित्रे समाज माध्यमाद्वारे प्रसारित केली. परंतु हा प्रेमविवाह श्रीकृष्ण याच्या आई-वडिलांना अजिबात मान्य नव्हता. त्यातून त्यांनी पहाटे नववधू रेखा हिचे हातपाय तारेने बांधून गळफास देऊन तिचा निर्घृण खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह घराच्या पाठीमागे जाळून टाकला. रेखा हिचे वडील रघुनाथ रावसाहेब जमदाडे (रा. येळवी. ता. जत, जि. सांगली) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर या गुन्हय़ाची नोंद झाली आहे. रेखा हिच्या जाळलेल्या मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेण्यात आले असून त्यांची तपासणी केली जाणार आहे.