चुलत्यावर कुऱ्हाडीचे वार करून त्याची हत्या करणाऱ्या पुतण्याला पालघर जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा  सुनावली. ही घटना २०१६ मध्ये घडली होती.

डहाणू तालुक्यातील चारोटी डोंगरीपाडा परिसर येथे मार्च २०१६ मध्ये जमिनीच्या वादातून चुलता जानू मंगळ्या डगला याच्यावर आरोपी पुतणा रवींद्र डगला याने आधी  भांडण  करुन त्यानंतर पहाटेच्या सुमारास जानू याच्यावर त्याच्या घराच्या अंगणात कुऱ्हाडीने घाव घातले. त्यावेळेस आरडाओरड केली असता घटना पाहणारी प्रत्यक्षदर्शी त्याची चुलती व त्याच्या मुलांनाही जीवे मारण्याची धमकी त्याने दिली.

याप्रकरणी रवींद्र डगला याच्या विरोधात कासा पोलीस ठाण्यात त्यावेळी खून केल्याप्रकरणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस  निरीक्षक ए. एन. पाटील यांनी आरोपी रवींद्र याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी रवींद्र याच्या विरोधात सबळ पुराव्यानिशी पालघर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. गुल्हाने यांनी या प्रकरणात एकूण आठ साक्षीदार तपासले.