सागर किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा चव्हाटय़ावर; स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्घटना
मुरुड समुद्र किनाऱ्यावर सोमवारी झालेल्या दुर्घटनेतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह मंगळवारी सापडला. मडकी सफ अहमद असे त्याचे नाव आहे. यामुळे दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्याची संख्या १४ झाली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रायगड जिल्ह्य़ातील समुद्र किनाऱ्यावर सातत्याने पर्यटक बुडण्याच्या घडणाऱ्या घटना लक्षात घेऊन, त्या रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याची मागणी होत
आहे.
पुण्यातील अबिदा इनामदार महाविद्यालयातील १२६ विद्यार्थी सहलीसाठी मुरुड येथे आले असता सोमवारी दुपारी जेवणानंतर वीसजण समुद्रात उतरले होते. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे सर्व जण बुडाले. यातील सहा जणांना स्थानिक मच्छीमाराना वाचवण्यात यश आले तर उर्वरीत १४ जणांचा बडून मृत्यू झाला. यात १० मुली आणि चार मुलांचा समावेश आहे. बुडालेल्या १४ जणांपकी १३ जणांचे मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढले होते. मात्र मडकी सफ अहमद याचा तपास लागत नव्हता. त्याच्या शोधासाठी कोस्टगार्ड आणि नेव्हीच्या हेलिकॉप्टर, बोटींची मदत घेण्यात आली होती. रात्र
झाल्याने ही शोध मोहीम थांबवण्यात आली होती.
मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा स्थानिकांच्या मदतीने शोध व बचाव मोहीमेला सुरवात करण्यात आली. यावेळी स्थानिक मच्छीमारांना मडकी सफ अहमद याचा मृतदेह किनाऱ्या जवळ दगडात अडकलेल्या स्थितीत आढळून आला. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून अबेदा इनामदार महाविद्यालयाचे विद्यार्थी थेट राजपुरी खाडीच्या मुखाजवळील परिसरात पाण्यात उतरली. ओहटी असल्याने पाण्याचा प्रवाह समुद्राच्या दिशेने होता. त्याचा अंदाज न आल्याने हे सर्व जण समुद्राच्या दिशेने ओढले गेले आणि प्राण गमावून बसले.
झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असला तरी यातून येणारया पर्यटकांनी योग्य तो बोध घेण गरजेच आहे. अन्यथा असे प्रकार घडत राहणार आहे. रायगड जिल्ह्य़ात गेल्या १५ वर्षांत मुरुड समुद्र किनारयावर २४ तर काशिद समुद्र किनारयावर ५७ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. अलिबाग, नागाव, दिवेआगर, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन किनारयावरही पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनामध्ये बुडणारे हे बहुतांशी पुण्यातील आणि काही प्रमाणात ठाण्यातील पर्यटक आहे.
मद्यपान करून समुद्रात उतरणे, अतिउत्साहाच्या भरात स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष्य करणे, भरती ओहोटी आणि पाण्याच्या प्रवाहाचे ज्ञान नसणे ही या घटनांमागील मुळ कारणे आहेत. यामुळे समुद्र किनारे हे पर्यटकांशी सुरक्षित राहिले नाही अशी भीती व्यक्त केली जाते. याचा विपरीत परिणाम रायगड जिल्ह्य़ातील पर्यटन उद्योगाला बसतो आहे.
ही बाब लक्षात घेऊन पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी काही तातडीच्या उपाययोजना करणे गरजेच आहे. समुद्र किनारयांवर धोक्याची सूचना देणारे फलक बसवणे, प्रमुख पर्यटन स्थळांवर जीवरक्षकांची नेमणुक करणे, पर्यटकांना सुचना देण्यासाठी ध्वनीप्रक्षेपक यंत्रणा बसवणे, पर्यटकांना समुद्रस्नानासाठी ठराविक भाग आरक्षित करणे, याभागाभोवती संरक्षक जाळ्या अथवा मार्गदर्शक फलकांची व्यवस्था करणे गरजेच आहे. समुद्र किनारयावर लाईफ जॅकेट्स, लाईफ बोट, सर्च लाईट, िरग बायज् यासारख्या सुविधा पर्यटन विकास योजनेतून उपलब्ध करून देण गरजेच आहे.
अलिबागचा समुद्रकिनारा पुर्वी पर्यटकांसाठी अंत्यत धोकादायक मानला जात होता. आता मात्र येथे पर्यटक बुडण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे, कारण नगरपालिकेने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पाऊले उचलली आहे.
रायगड जिल्ह्य़ातील समुद्र किनाऱ्यांना दरवर्षी सरासरी पाच ते सहा लाख पर्यटक भेट देतात. यातील बहुतांश पर्यटकांना समुद्रातील पाणी आणि प्रवाहांचा अंदाज नसतो. त्यामुळे गोव्याच्या धर्तीवर कोकणातील किनारयांवर सुरक्षा व्यवस्था करणे गरजेच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यटक बुडण्याची  प्रमुख कारणे-
’ पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज नसणे.
’ मद्यपान करून समुद्रात उतरणे.
’ स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणे.
’ पर्यटकांचा अतिउत्साह.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murud beach tragedy missing students body fished out
First published on: 03-02-2016 at 00:21 IST