नगर शहराच्या पाच शतकांच्या वाटचालीचा साक्षीदार असलेला हस्त बेहश्त बाग महाल परिसर काल, शनिवारी शहराच्या स्थापना दिनाच्या सायंकाळी भक्ती सुफियाना, कव्वाली मैफलीच्या सुरेल स्वरांनी व त्याबरोबरीने केलेल्या विविध रंगी प्रकाशाच्या सुंदर मिलाफीने उजळुन निघाला होता. या अनोख्या माहोलाचा नगरकर रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.
शहराचा ५२६ वा स्थापना दिन साल साजरा करण्यात आला. रसिक ग्रुप गेल्या २६ वर्षांपासुन विविध उपक्रमांनी दरवेळी शहराचा वर्धापनदिन साजरा करते. सावेडी भागातील हस्त बेहस्त बाग महालात गायक पवन नाईक व त्यांच्या सहकार्यानी सादर केलेल्या उर्दू, मराठी, हिंदी गितांनी श्रोत्यांच्या मनावर गारुड करत यंदा या उपक्रमाला चार चाँद लावले.
जय जय गणराज.., निराकार साकार.., ना तेरा भरोसा.., ख्वाजा मेरे ख्वाजा.., कितना सोनु तेनु रबने बनाया.., अशा भक्तीपुर्ण, सुफियाना, कव्वाली, सर्वधर्म समभावातील गितांनी कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेले. शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम गीताचा अनोखा मेळ, स्वर सरगम, तान, शब्द लय व ललकारी याबरोबरच बासरी, सतार, हर्मोनिअम बुलबुल, तबलाच्या वादकांची जुगलबंदीला प्रेक्षकांनी टाळ्याच्या गजरात प्रतिसाद दिला. विणा दिघे यांनी बहारदार निवेदन केले.
यावेळी बोलताना महापौर अभिषेक कळमकर यांनी रसिक ग्रुपच्या उपक्रमातुन शहराची सांस्कृतिक समृद्धी वाढत असल्याचे कौतुक केले व अशा उपक्रमांना सहकार्य करण्याचे अश्वासन दिले. श्री. अनिल जोशी, चंद्रकांत पालवे, दिगंबर ढवण आदींची भाषणे झाली. रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. श्री. भुषण देशमुख यांनी हस्त बेहश्त बाग महालाचा इतिहास सांगितला. तेजा पाठक यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संकेत होशिंग, सुदर्शन कुलकर्णी, ॠषिकेश येलुलकर, समीर पाठक, स्नेहल उपाध्ये, नंदकिशोर आढाव आदींनी परिश्रम घेतले.