प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा : शेतीप्रधान कुटुंबातून शिक्षणासाठी महानगरात गेलेली मुलं परत गावाकडे न परतण्याची बाब नित्याचीच. शेतीचा वासही नको म्हणणाऱ्यांनी महानगरातून थेट घरच्या शेतीवर परतणाऱ्या व करोनाच्या अडचणीत घरपोच खरबूज विक्री करणाऱ्या शेतकरी अभियंता बंधूंचे उदाहरण नव्या पिढीसाठी एक उत्तम आदर्श ठरावे.

हिंगणघाट तालुक्यातील जांगोणा या गावातील रजत व शुभम या बंधूंची शेती व व्यावसायिक कौशल्य त्यांच्या पदवीवर मात करीत उत्पन्नाचा स्रोत ठरले. रजतने शासकीय तंत्रनिकेतनमधून पदविका घेतल्यावर पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून यांत्रिकेची पदवी घेतली. तर शुभम पुसदच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य शाखेत अंतिम वर्षांला आहे. वडील पुरुषोत्तम उईके शेतकरीच आहेत. पदवी घेतल्यावर गावी परतलेल्या रजतने वडिलांना शेतीकामात हातभार लावायचे ठरवले. वर्षभर नोकरीसाठी खटाटोप सुरू होतीच. पण रिकामे बसण्यापेक्षा कुटुंबाचा आधार शेतीच असल्याने त्याने शेतीत राबण्याचे ठरवले. कापूस, सोयाबीन या शेतीत वडिलांच्या पदरी फोरसे पैसे पडत नसल्याचे पाहून त्याने वडिलांच्या मित्राची सेंद्रिय शेती पाहिली. उन्हाळय़ात फोयद्याचे म्हणून दोन एकरावर खरबुजाची लगवण केली. रोज दहा क्विंटलचे उत्पादन होऊ लागले. मात्र मध्येच करोना आडवा आला. पिकाचे काय करायचे, कुटुंब कसे चालणार, खाऊ कोण घालणार, असे प्रश्न पडायला सुरुवात झाल्यावर रजत व शुभमने पुढचे पाऊल टाकले. बाजारपेठ बंद असली तरी ग्राहक तर आहे ना, असे उत्तर मिळाल्यावर घरोघरी जाऊन या अभियंता भावंडांनी विक्री सुरू केली. चांगला प्रतिसाद मिळू लागला. पण त्यात वेळ खूप जात असल्याचे पाहून त्यांनी वर्धेतील मगन संग्रहालयासमोर रस्त्यावर विक्री सुरू केली. चवीने अविट व टिकाऊ असे सेंद्रिय खरबूज हातोहात खपू लागले. रोज चारशे ते पाचशे रुपये नफो होत असल्याचे शुभम सांगतो.

अभियांत्रिकेची पदवी असूनही शेतीत कसे फि रकलात, असा प्रश्न केल्यावर घरी दोन पैसे येणे महत्त्वाचे आहे. वडिलांनी आमच्या शिक्षणासाठी कर्ज घेऊन ठेवले. ते पण फे डायचे आहे. त्यासाठी शेतीची व रस्त्यावर बसून विकायची लाज बाळगण्याचे कारण काय, असा सवाल शुभम करतो. या हंगामात वीस टनाचे उत्पादन होईल. त्यातून घरची निकड भागवून थोडेबहुत कर्ज कमी करण्याची खात्री असल्याचे तो सांगतो. या भावंडांचे कष्ट पाहून ‘यूथ फ ॉर चेंज’ या स्वयंसेवी संस्थेचे गुरुराज राऊत, हनुमान आत्राम, पार्वती उईके व अन्य पदाधिकाऱ्यांनी भावंडांना सहकार्य दिले. ही युवा चमू खरबूज विक्रीत त्यांना मदत करतात. हे पूर्णपणे जैविक शेती असून या परिसरात असा पहिलाच यशस्वी प्रयोग असल्याचे गुरुराज राऊत यांनी सांगितले. या पाच सदस्याच्या कुटुंबात याच उत्पन्नाचा आधार असून करोनामुळे उद्भवलेल्या अडचणींवर त्यांनी केलेली मात इतरांनाही प्रेरणादायी ठरावी, असे राऊत म्हणाले. रणरणत्या उन्हात शेतीत राबून शेतातल्याच झोपडीत काही क्षण विसावणाऱ्या या उईके बंधूंचे उदाहरण आगळेवेगळे ठरावे.