|| एजाजहुसेन मुजावर

इस्लाम धर्मात रमज़ान महिना अतिशय पवित्र समजला जातो. या काळात संपूर्ण महिनाभर रोजे करून आत्मशुद्धी केली जाते आणि परमेश्वराची उपासना केली
जाते. मुस्लिमांबरोबरच हिंदू भाविकही महिनाभर तेवढय़ाच सश्रद्ध भावनेतून रोजे करतात. यात उच्चशिक्षितांपासून ते थेट कारागृहातील कैद्यांचाही
समावेश आहे. भारतीय संस्कृतीला पोषक असे हे आश्वासक चित्र सोलापुरात शहरी व ग्रामीण भागात पाहावयास मिळते.

भारतीय समाज हा मुळातच बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक आणि बहुभाषिक आहे. पूर्वी धर्मात कट्टरतावाद अजिबात नव्हता. पूर्वी धर्म हा जीवनाचा मार्ग व
तत्त्वज्ञान सांगणारा होता. त्यात अध्यात्माचा भाव होता. धर्म म्हणजे कोणती संघटना नव्हती. संघटना नव्हती म्हणजे राजकारणही नव्हते. परंतु
अलीकडे धर्माकडे संघटना पर्यायाने राजकारणाचे साधन म्हणून पाहिले जाऊ लागले. परंतु तरीही धर्माकडे बहुभाषिक, बहुसांस्कृतिक संस्कार म्हणून
पाहण्याची परंपरा आजही पाळली जाते. त्याचाच एक भाग म्हणजे मुस्लीम धर्मात अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या रमज़ान महिन्यात संपूर्ण रोजे करणारे हिंदू
भाविकही आढळून येतात. मुस्लीम कुटुंबीयांकडून गणेशोत्सव काळात घरी मंगलमय वातावरणात लक्ष्मीमूर्तीची  प्रतिष्ठापना करणे, नवरात्रोत्सवात
हिंदूंप्रमाणेच मुस्लीम भाविकही नऊ दिवस उपवास करणे, घटस्थापना करणे इत्यादी रीती व परंपरा पाळतात. तर मोहरम उत्सवात मुस्लिमांपेक्षा जास्त
प्रमाणात हिंदू भाविक श्रद्धेने नैवेद्य दाखवून नवस फेडतात, एखाद्या सूफी संतांच्या उरुसात हिंदू घराण्यांना मान दिला जातो.

अशा या बहुसांस्कृतिक भारतीय समाजात यंदाही रमज़ान महिन्यात कठोर स्वरूपाचे रोजे करणारे अनेक हिंदू कुटुंबीय आढळून आले. काही जण इच्छा
असूनही वयोपरत्वे आणि शारीरिक आजारांमुळे रोजे करणे शक्य होत नसल्याने खंत बोलून दाखवितात. माजी नगरसेवक गोविंद एकबोटे (वय ७४) यांनी यापूर्वी
सलग १५ ते १६ वर्षे रमज़ान महिन्याचे संपूर्ण दिवस रोजे केले आहेत. यंदा मात्र मधुमेहामुळे रोजा करता आला नाही, याची त्यांना खंत वाटते. अशीच खंत
सध्या कळंब (जि. उस्मानाबाद) येथे शासकीय रुग्णालयातील डॉ. जीवन वायदंडे हे देखील व्यक्त करतात. यापूर्वी आपण सलग १५ वर्षे रमज़ान महिन्यात न चुकता
रोजे करीत होतो. सांगोल्यात व नंतर पंढरपुरात असतानाही दरवर्षी रमज़ान महिन्यात रोजे करण्याची संधी सोडली नव्हती, असे डॉ. वायदंडे सांगतात.
सोलापुरात उत्तर कसबा-लोणारी गल्लीत राहणारे भागवत  मारुतीराव गायकवाड (वय ५३) हे गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने रमज़ान महिन्याचे रोजे
करतात. गायकवाड हे इलेक्ट्रिकल उपकरणांच्या दुरुस्ती सेवा केंद्रात नोकरीस आहेत. यंदा त्यांचा महाविद्यालयीन शिक्षण घेणारा मुलगा प्रशांत
(वय १९) हा देखील संपूर्ण महिनाभर रोजे करीत आहे. गायकवाड हे मुळातच धार्मिक व अध्यात्म जीवन जगणारे आहेत. दरवर्षी आपण श्रावणमासात उपवास
करतो, यापूर्वी गाणगापुरात जाऊन दत्तात्रेयाची सलग तीन महिने उपासना करताना भिक्षुकीही केली होती. त्याच प्रमाणे रमज़ान महिन्यातही संपूर्ण
रोजे करीत असल्याचे गायकवाड हे नमूद करतात. माजी महापौर नलिनी चंदेले, शिवसेनेचे नगरसेवक प्रथमेश कोठे यांनीही खासगी आयुष्यात रोजे करून
आत्मशुद्धीची अनुभूती घेतली आहे.

जिल्हा कारागृहातील कैद्यांनी केले जाणारे रोजे हे त्याचेच द्योतक आहे. जिल्हा कारागृहात गेले महिनाभर ३५ कैद्यांनी रोजे केले आहेत. यात २४
पुरुष कैद्यांपैकी १९ मुस्लीम तर ५ हिंदू कैद्यांचा समावेश आहे. तर महिला कैद्यांपैकी ११ जणींनी रोजे केले आहेत. यातील बहुसंख्य म्हणजे ८ महिला
कैदी हिंदू आहेत, तर तीन मुस्लीम महिला कैद्यांचा समावेश आहे. जिल्हा कारागृहाचे अधीक्षक एस. एल. कुलकर्णी हेदेखील कैद्यांनी रोजे केल्याचे
पाहून प्रभावित झाले आहेत. त्यांनी स्वत:च्या वैयक्तिक पगारातून रोजदार कैद्यांसाठी रमज़ान ईदसाठी शिरखुर्मा व इतर खाद्यपदार्थ तयार करून
घेण्याची तयारी चालविली आहे.