संमेलनाच्या स्वागताध्यक्षानंतर आता ग्रंथपालखीचा उद्घाटकही नवा
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबईत होणाऱ्या १६ व्या साहित्य संमेलनात पदांसाठीचा ‘खो खो’ सुरुच असून आता स्वागताध्यक्षापाठोपाठ ग्रंथपालखीचा उद्घाटकही बदलण्यात आला आहे. ग्रंथपालखीच्या नियोजित उद्घाटक महापौर स्नेहल आंबेकर यांच्याऐवजी आता श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद शिवसेनेकडून ‘भाजप’कडे गेल्यामुळे महापौरांनी उद्घाटक म्हणून येण्यास असमर्थता व्यक्त केली असल्याची चर्चा आहे.
‘कोमसाप’चे १६ वे साहित्य संमेलन २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. ‘कोमसाप’तर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तसेच ‘कोमसाप’तर्फे या पूर्वी काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातही ग्रंथपालखीचे उद्घाटन महापौर आंबेकर यांच्या हस्ते होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेत उद््घाटक म्हणून महापौर आंबेकर यांच्याऐवजी आता श्री सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांचे नाव देण्यात आले आहे.‘कोमसाप’च्या साहित्य संमेलनासाठी स्वागताध्यक्ष म्हणून शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांची निवड करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित ‘मदत’ न मिळाल्याने स्वागताध्यक्ष पदावरून त्यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय ‘कोमसाप’ने घेतला आणि त्यांच्या जागी ‘भाजप’चे आमदार आणि ‘भाजप’च्या मुंबई शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांची निवड करण्यात आली. आता ग्रंथपालखीचा उद्घाटकही ‘कोमसाप’ला बदलावा लागला आहे. दरम्यान या संदर्भात ‘कोमसाप’चे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी महापौर आंबेकर उद्घाटन सोहळ्यास नक्की येतील असा विश्वास व्यक्त करून महापौर व राणे या दोघांच्याही हस्ते उद्घाटन करणार असल्याचे सांगितले. तर महापौर आंबेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

हॉटेलच्या उद्घाटनासाठी सवड;
मात्र ग्रंथपालखीसाठी वेळ नाही!
हॉटेलचे उद्घाटन करण्यासाठी वेळात वेळ काढणाऱ्या महापौर आंबेकर यांना ग्रंथपालखीच्या उद्घाटनासाठी अगोदर होकार देऊनही आता वेळ नाही म्हणण्याचे कारण ‘राजकीय’ असल्याची चर्चा आहे. ‘कोमसाप’चे साहित्य संमेलन पहिल्यांदा मुंबईत होत असल्याने शहराचा ‘प्रथम नागरिक’ या नात्याने ग्रंथपालखीचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते करण्याचे ‘कोमसाप’ने ठरविले आणि तसे पत्रही त्यांना देण्यात आले. महापौरांकडून ‘कोमसाप’ला होकार मिळाल्याने तसे जाहीरही करण्यात आले होते.