|| निखिल मेस्त्री

पालघरच्या ग्रामीण भागात बचत गटाचा उत्पादनातून ‘लोकल टू ग्लोबल’ बनण्याचा मानस

पालघर : पारंपरिकतेला आधुनिकतेचा परीसस्पर्श देऊन पालघरच्या ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांनी नाचणीच्या बिस्किटांचे (रॅगी कुकीज) उत्पादन सुरू केले आहे. या बिस्किटांना मोठी लोकप्रियता आणि  मागणी येत असून ते पाहता उत्पादनातून बिस्किटे ‘लोकल टू ग्लोबल’ बनवण्याचा निर्धार बचत गटाच्या महिलांनी केला आहे.

पालघर तालुक्यातील आदर्श प्रभाग संघ नंडोरे-देवखोपअंतर्गत असलेल्या विविध बचत गटाच्या सात ते दहा महिलांनी एकत्रित येत ही किमया साधली आहे. शासनाच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उमेद अभियानाद्वारे त्यांच्या पंखाना  बळ मिळाले आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी या महिलांनी बेकरी उत्पादने या विषयीचे प्रशिक्षण घेऊन प्रथमस्तरावर लहान सहान प्रयोग सुरू केले.  त्यात त्यांना यश मिळू लागले. बचत गटाच्या रुईणी सुतार, अरुणा सुतार, ज्योत्स्ना पाटील, साधना कुडू, सरिता पाटील, प्रज्ञा पाटील, कविता सुतार, दीपाली कुडू अशा प्रशिक्षित महिलांनी नाचणी बिस्किटाचे उत्पादन डिसेंबर २०१९ मध्ये सुरू केले. बिस्कीटसाठी लागणारा कच्चा माल तयार करण्यासाठी बचत गटातीलच एका महिलेची खोली भाड्याने घेतली. उत्पादनासाठी त्यांनी पालघरमधील एक बेकरी भाडेतत्त्वावर घेतली.  बेकरीत तयार कच्चा माल आणून तेथे प्रक्रिया सुरू केली.  या आगळ्यावेगळ्या बिस्किटांना प्रदर्शन व विक्रीसाठी महालक्ष्मी सरसमध्ये संधी मिळाली. गटाने सुरुवातीला दोनशे किलो उत्पादन घेत आपले उत्पादन विक्रीसाठी ठेवली. तेथे या बिस्किटांना ग्राहकांनी पसंती दर्शवली व काही दिवसांतच बिस्किटांची मागणी वाढली. पुन्हा या महिलांना दुसऱ्या सरसमध्ये संधी मिळाल्याने त्यांनी पूर्वीपेक्षा चांगले यश मिळाले.

बिस्किटांचा उत्पादनासाठी बारा ते चौदा तास मेहनत घेत आहेत. गेल्या सहा महिन्यांत सुमारे सहाशे किलोचे उत्पादन त्यांनी केले आहे. बिस्किटांचे पॅकिंग, वितरण याच महिला करीत आहेत. या बिस्किटांची जाहिरात त्या स्वत: करीत आहेत. त्यामुळे या नाचणी बिस्कीटने स्थानिक पातळीवरच नव्हे तर अमेझॉन, झायलो फूड अशा नामांकित बाजारातही आपले स्थान पक्के केले आहे.

नाचणी ही सत्त्वयुक्त असल्याने तसेच लहान मुलांसह मोठ्यांनाही आरोग्याच्या दृष्टीनेही ती फायदेशीर आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या कल्पनेला ग्राहक दाद देत आहेत.  याच बिस्किटांमध्ये विविध चवीचे प्रकार नव्याने तयार केले आहेत. जिल्ह्यात जव्हार भागात नागलीचे पीक घेतले जात असल्याने या महिलांनी सुरुवातीला स्थानिक स्तरावरून ती खरेदी केली. मात्र मागणी मोठी असल्याने घाऊक बाजारातून ती विकत घ्यावी लागत आहे. भविष्यात कारखाना सुरू केल्यानंतर बचत गटामार्फत सामूहिक शेतीतून नागली पीक उत्पादन करण्याचा मानस या महिलांचा आहे. सत्त्वयुक्त बिस्किटे कुपोषणग्रस्त बालकांना आहाराच्या माध्यमातून देऊन जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न करणार असल्याचे जीवनोन्नती अभियानाचे प्रमुख माणिक दिवे यांनी म्हटले आहे. नाचणी बिस्किटानंतर नाचणी सत्त्व तयार करण्याचे लक्ष या गटाने समोर ठेवले आहे. त्याचप्रमाणे प्रभाग संघ स्तरावर नाचणी कुकीस आणि नाचणी सत्त्व उत्पादित करणारे पोषणपदार्थावर आधारित उद्योग उभारण्याचे निश्चित केले.

शासनाची मदत तरी अडचणी

शासनाने बचत गटाला या उद्योगासाठी मदत केली असली तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रॅगी बिस्कीट विक्रीसाठी शहराच्या ठिकाणी कमी खर्च येईल अशी जागा उपलब्ध करून  द्यावी, अशी अपेक्षा बचत गटाच्या महिलांनी व्यक्त केली आहे.

वैविध्यपूर्ण उद्योगासाठी बचत गटांच्या महिलांना चालना देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. यामुळे स्वविकास, संघटन कौशल्य याला वाव मिळेल. अशा उद्योगांमुळे हजारो महिलांच्या हातांना रोजगार प्राप्त होऊन निश्चितच त्यांचे सबलीकरणाकडे वाटचाल होईल. -सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.पालघर

 

दूरदृष्टी ठेवून या महिलांनी सुरू केलेला हा उद्योग भविष्यात बचत गटांच्या माध्यमातून हजारो हातांना काम देऊन महिलांमध्ये संघटनशक्ती, स्वविकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण करणार आहे. -प्रज्ञा प्रशांत पाटील, क्लस्टर व्यवस्थापक