News Flash

रायगडमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट, शिवसेना-भाजपचा शिरकाव

स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या शिवसेना व भाजपचा नगरपालिकांमध्ये शिरकाव झाला आहे.

रायगड जिल्ह्य़ात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मुरुड आणि माथेरानचे अपवाद वगळता प्रस्थापित पक्षांनी आपली सत्ता कायम राखली. निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत बंडखोरीमुळे त्रस्त झालेल्या राष्ट्रवादीची जिल्ह्य़ात पीछेहाट झाली, तर स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या शिवसेना व भाजपचा नगरपालिकांमध्ये शिरकाव झाला आहे.

रायगड जिल्ह्य़ात झालेल्या नऊ नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन, तर शेकाप आणि भाजपला प्रत्येकी एका नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यात यश आले. रोहा, श्रीवर्धन आणि खोपोली नगरपालिकांवर वर्चस्व राखण्यात राष्ट्रवादीला यश आले. तर मुरड आणि माथेरानमध्ये पक्षाची मोठी पीछेहाट झाली. दोन्ही ठिकाणी शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली. अलिबागमध्ये शेकापने निर्वविाद वर्चस्व कायम राखले, तर महाड आणि पेण या नगरपालिका काँग्रेसने पुन्हा एकदा जिंकल्या, उरणमध्ये भाजप विजयी झाली.

विविध पक्षांतील असंतुष्टांना एकत्र करून पक्षाची मोट बांधण्याची भाजपची खेळी काही प्रमाणात यशस्वी झाली. उरण नगरपालिकेवर भाजपला एकहाती मिळाली, तर पेण आणि खोपीलीत पक्षाचे नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले. पेण अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी असणाऱ्या संतोष शृंगारपुरे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्याचा निर्णय मात्र फसला.

रायगड हा एके काळी शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र शहरी भागात पक्षाची ताकद क्षीण होत असल्याचे या निवडणुकीत दिसून आले. राष्ट्रवादीशी आघाडी केल्याने अनेक ठिकाणी पक्षाला पूर्ण उमेदवार देता आले नव्हते. याचा फटका पक्षाला बसला. खोपील आणि पेणमध्ये ताकद असूनही पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षाची ताकद अलिबागपुरतीच मर्यादित राहिली.

मुरुड आणि माथेरानचे अपवाद सोडले तर जिल्ह्य़ातील मतदारांनी पुन्हा एकदा प्रस्थापितांच्या कौल दिला आहे.

रोहेकर तटकरेंच्या बाजूने

काका-पुतण्याच्या वादामुळे चच्रेचा विषय ठरलेली रोहा नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादीने जिंकली. रोह्य़ाच्या मतदारांनी काका सुनील तटकरे यांच्या बाजूनेच कौल दिला; पण नगराध्यक्षपद मिळताना राष्ट्रवादीच्या संतोष पोटफोडे यांना कसरत करावी लागली. राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार समीर शेडगे यांनी त्यांना अखेरच्या फेरीपर्यंत झुंज दिली. पोटफोडे यांना अवघ्या सहा मतांनी विजयी घोषित करण्यात आले. शिवसेनेत प्रवेश करून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे संदीप तटकरे निष्प्रभ ठरले. रोहा शहरातील बंडखोरी थोपवण्यात तटकरे यशस्वी झाले असले तरी मुरुड आणि खोपीलीतील बंडखोरी पक्षाला भोवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 1:36 am

Web Title: nagar palika election in raigad
Next Stories
1 नगर जिल्हय़ात भाजपची बाजी
2 इस्लामपूर, तासगावातील राष्ट्रवादीचे गड उद्ध्वस्त
3 भाजपचा विजय नोटाबंदीमुळे नव्हे तर जुन्या नोटांमुळे – राज ठाकरे
Just Now!
X