नागपूर विधानसभेसमोर गुरुवारी देखील एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. आशिष आमदरे असे या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आशिष हे दिव्यांग असून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्याने त्यांनी हा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.

नागपूरमध्ये राहणारे आशिष आमदारे हे दिव्यांग असून काही दिवसांपूर्वी दुचाकीवरुन जात असताना टँकरने त्यांना धडक दिली. यानंतर टँकर चालकाने मदत करण्याऐवजी त्यांच्याशी वाद घालून मारहाण केली. आशिष हे पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करुन घेतली नाही. याऊलट टँकरचालकानेच आशिष यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनीही आशिष यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या अन्यायाविरोधात आशिष आमदारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपेक्षित मदत न मिळाल्याने आशिष आमदरे हताश झाले. गुरुवारी दुपारी ते विधानभवनाच्या आवारात आले. त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. हा प्रकार बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने आशिष यांना रोखले आणि पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, बुधवारी देखील विधानभवन परिसरात एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. महापालिकेतील एका बडतर्फ कर्मचाऱ्याने विधानभवनासमोर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. मात्र, बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतल्यामुळे अनर्थ टळला. प्रकाश बर्डे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो महापालिकेच्या अग्निशमन विभागात वाहनचालक म्हणून कार्यरत होता.