नाशिक शहरात संपूर्ण परिस्थितीवर चार ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जात असल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली. आपण आतापर्यंत युद्ध जिंकत आलो आहोत, यापुढेही आपण हे युद्ध जिंकू असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्वांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. बुधवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. “तब्बल ७७७ जणांवर संचारबंदीचा नियम मोडल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच शहरातील ७२८ निर्वासितांसाठी ५ ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे,” असं नांगरे-पाटील म्हणाले. “नाशिकमधून दिल्लीत गेलेल्या २१ जणांपैकी १६ जणांची माहिती मिळाली असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तसंच आपल्या कर्मचाऱ्यांना याची लागण होऊ नये म्हणून एक अॅपही विकसित करण्यात आलं आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रशासन त्यांच्यावर नजर ठेवून आहे. क्वारंटाइन करण्यात आलेल्यांशी दिवसातून ३ वेळा व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे संपर्क साधला जातो,” अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मंडईतील गर्दी कमी करण्याचे प्रयत्न

“नाशिकमधील प्रमुख मंडईतील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रमुख मंडईतील गर्दी कमी करण्यासाठी ते २२ ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. आता प्रमुख मंडईत केवळ एक किंवा दोन शेतकरी किंवा त्यांचे प्रतिनिधी मालाच्या विक्रीसाठी येतील याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी कमी झाली आहे,” असं नांगरे-पाटील म्हणाले.

अत्यावश्यक सेवांना मास पासेस
“अत्यावश्यक सेवा कुठेही थांबू नयेत किंवा त्यात व्यत्यय येऊ नये यासाठी त्यांना मास पासेस देण्यात आले आहेत. तसंच जीवानावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या दुकानांनाही पासेस देण्यात आले आहेत. या अनुशंगानं आमच्या कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन करण्यात आलं आहे. काही ठिकाणी आम्ही स्टिंग ऑपरेशनही केलं आहे. आम्ही आमच्या चांगल्या कर्मचाऱ्यांना बक्षिसही देत आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं.