नागपूर पोलीस शहरातील मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानातील चेजिंग रुमची तपासणी करणार आहेत. नागपुरातल्या सीताबर्डी भागात सोमवारी जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. चेजिंग रुम किंवा ट्रायल रुममध्ये छुपे कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत ना? याचा तपास पोलीस करणार आहेत. त्यासाठी ते साध्या वेशात जाऊन कधीही कोणत्याही दुकानाला किंवा मॉलला भेट देणार आहेत. त्या ठिकाणी असलेल्या चेंजिग किंवा ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा तर नाही ना? हे पोलीस तपासणार आहेत.

नागपुरातल्या सीताबर्डी भागात फ्रेंड्स कलेक्शन या कपड्यांच्या दुकानातल्या चेजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा असल्याचा प्रकार एका तरुणीच्या सतर्कतेमुळे कालच लक्षात आला होता. याप्रकरणी दुकानाच्या मालकाला आणि कर्मचाऱ्याला अटकही करण्यात आली. मात्र याच घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपुरातल्या सगळ्या मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानांमधल्या चेजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा तर नाही ना? हे तपासले जाणार आहे.

नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक शहरातल्या विविध मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानांमध्ये जाऊन चेजिंग किंवा ट्रायल रुमची तपासणी करणार आहे. दरम्यान सीताबर्डी या ठिकाणी असलेल्या फ्रेंड्स गारमेंट या दुकानाचे गुमास्ता लायसन्स रद्द करावे अशी मागणी इंटकचे नेते राजेश निंबाळकर यांनी केली आहे. ज्या दुकानाच्या ट्रायल रुममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला त्या दुकानाचा परवानाच रद्द केला जावा अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे.