मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील खर्च नोंदवहीच्या तपासणीस ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील नॅशनल पीपल्स पक्षाचे संजय बंडू पाटील आणि अपक्ष उमेदवार संजय निवृत्ती पाटील हे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १७१ (आय) मधील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुनील यादव यांनी ९ मे रोजी उमेदवारांच्या निवडणूक खर्च नोंदवह्यांची प्रथम तपासणी केली. त्यावेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक खर्च लेखा तपासणीस खर्च नोंदवहीसह उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र या तपासणीस संजय बंडू पाटील आणि संजय निवृत्ती पाटील हे दोन्ही उमेदवार उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांच्या प्रतिनिधीनेही निवडणूक खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर केली नाही. त्यामुळे या उमेदवारांना ११ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पुन्हा उपस्थित राहण्याची एक संधी देण्यात आली. मात्र, तेव्हाही या दोन्ही उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींमार्फत निवडणूक खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर करण्यात आली नाही.
दरम्यान, या दोन्ही उमेदवारांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ मधील कलम ७७ (१) मधील तरतुदीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम १७१ (आय) मधील तरतुदीनुसार या दोन्ही उमेदवारांविरुद्ध कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली.