शेतकरी प्रश्न, नाणार प्रकल्प, प्लास्टिक बंदी आदी विविध प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर घणाघाती शब्दांत टीका केली. तूर, हरभरा, सोयाबीनची संपूर्ण खरेदी न करता सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे. प्लास्टिक बंदी ही भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे, असे म्हणत मुंबई डीपीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला. बिल्डरों को हाथ, बीजेपी पक्षनिधी के साथ, असा भाजपाचा कारभार सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला. पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूरमध्ये घेण्याचे कारण काय, असा सवालही उपस्थित केला.

या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आदींसह दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. तत्पूर्वी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक होऊन त्यात रणनीती ठरवण्यात आली. अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षांनी चहापानावर बहिष्कार घातला. सरकारचे फिस्कटलेले चॅलेंज या आशयावर विरोधकांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून सरकारवर टीका केली. या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

मुंडे पुढे म्हणाले, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाबाबत हे सरकार पूर्णपणे उघडे पडले आहे. आरक्षण देण्याबाबत हतबलता व्यक्त करणे, स्पष्ट नकार देणे सुरू आहे. ही या समाजांची उघड उघड फसवणूक आहे. मुख्यमंत्री भ्रष्ट मंत्र्यांना वारंवार पाठीशी घालत आहेत. डिजिटल महाराष्ट्र, डी.बी.टी. योजना अपयशी ठरली, ऑनलाइन महाराष्ट्र कुठेच दिसत नाही. हे सर्व प्रकल्प अपयशी ठरले आहे. याचा सरकारला जाब विचारू.

नाणारची नौटंकी सुरू आहे. अनेक देशांनी नाकारलेल्या कंपनीला या सरकारने काम दिले आहे. जनतेचा विरोध असेल तर आम्ही प्रकल्प होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे त्यांनी म्हटले. नागपूरची कायदा व सुव्यवस्थाही मुख्यमंत्री राखू शकत नाहीत. नागपुरात आणि राज्यातही कायदा व सुव्यवस्था नाही. औरंगाबादमध्ये दंगल होते. साध्या अफवांवरुन खून होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या परस्पर पुणे पोलीस कारवाई करत असतील तर गृहखाते चालवते तरी कोण, असा सवाल त्यांनी विचारला. सर्व आघाडयांवर अपयशी ठरलेल्या सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर अधिवेशनमध्ये सरकारला सर्व प्रश्नांवर जाब विचारू. अधिवेशनात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न लावून धरू, असे ते म्हणाले.