भाजपकडे ज्योतिषांची संख्या जास्त आहे. अशा ज्योतिषांच्या सल्ल्यामुळेच कदाचित मंत्री मंडळाच्या विस्तारास मुहूर्त लांबला असावा, अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपवर केली.

माजी मुख्यमंत्री राणे यांनी आपल्या पक्षाच्या बांधणीसाठी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला असून आज त्यांनी सांगलीत येऊन पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना ते म्हणाले की, आजपर्यंत आपणास मिळालेली पदे ही गुणवत्तेवर मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला जाईल असा विश्वास आहे.

आपल्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत सेनेचा विरोध आहे का? असा थेट सवाल केला असता ते म्हणाले, की सेनेची तेवढी ताकद उरलेली नाही. मात्र, भाजपकडे ज्योतिषांची संख्या जास्त असल्याने कदाचित मंत्री मंडळाच्या विस्तारास मुहूर्त लांबला असावा. गुजरात निवडणुकीनंतर संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

आपणास सर्वच पक्षात सहभागी होण्याचे आमंत्रण होते. सेनेनेही एक वर्षांपूर्वी पक्ष प्रवेशासाठी ऑफर दिली होती. मात्र, आपण सर्वधर्म समभाव या विचारावर नवीन पक्ष स्थापन केला असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपा आपणास फसवेल असे वाटत नाही.

काँग्रेस दिशाहीन पक्ष

काँग्रेस दिशाहीन पक्ष बनला असून दिलेले शब्द पाळले जात नाहीत. अगदी विमानात बसताना मुख्यमंत्री पदाबाबत अभिनंदन केले जात होते. मात्र दुसऱ्या दिवशी वेगळेच नाव जाहीर केले जात होते. मराठा आरक्षणाबाबत आपल्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीने अन्य राज्यांचा अभ्यास करून १६ टक्के जागांचे आरक्षण देण्याची शिफारस केली होती. याचा आमचा पक्ष पाठपुरावा करेल असेही त्यांनी सांगितले.