कोकणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद आता आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. नीलेश राणे यांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच निलेश राणे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या प्रचारसभांना हजर न राहण्याचा निर्णयसुद्धा या बैठकीत घेण्यात आला आहे.
सिंधुदुर्गात नारायण राणे आणि राष्ट्रवादीत पक्ष यांच्यात फार जुना वाद आहे. नारायण राणे सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांबाबत फोडाफोडीचे राजकारण केल्याचा, तसेच जिल्ह्य़ातील विविध समित्यांवरील नेमणुका आणि योजनांच्या लाभापासून राष्ट्रवादी काँग्रेसला कटाक्षाने दूर ठेवल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर रोष आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस आघाडी असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकत्रे प्रचारापासून दूर राहिले आहेत. हरप्रकारे प्रयत्न करूनही त्यांच्या भूमिकेत बदल झालेला नाही. यावर अखेरचा उपाय म्हणून राणे यांनी शनिवारी अजित पवार आणि रविवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रचारसभा आयोजित केल्या आहेत.