नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १२ तासांमध्ये खुनाचा तपास पूर्ण केला आहे. मनमाडमधील ४५ वर्षीय व्यक्तीच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी महेंद्र सोनवणे या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सटाणे शिवारातील भालूर रस्त्यालगत एका शिवारातील नाल्यामध्ये ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या व्यक्तीचा निर्घुणपणे खून करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला आणि आरोपीच्या शोधासाठी मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा या ठिकाणी शोधपथक पाठवले.

स्थानिक गुन्हे शाखेचे किशोर नवले यांना मनमाड परिसरातील खबरींनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार घटनेच्या दिवशी दोन इसम दारूच्या नशेत मनमाड ग्रामीण भागात क-ही गावाकडे पायी जात होते. गावात याबाबत विचारपूस केली असता मालेगाव येथील काही इसम शेततळ्याच्या कामासाठी आले असल्याची माहिती मिळाली. त्यामध्ये संशयित सोनवणे (वय वर्षे २७, रा. खाकुर्डी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी आपला धाक दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

१२ जानेवारी रोजी मनमाड रेल्वे स्थानक परिसराजवळ असलेल्या दारुच्या गुत्त्यावर त्याची मृत व्यक्ती दादाजी यांच्याशी ओळख झाली. दारूच्या नशेत पुढे येत असताना वाद झाल्याने संशयित सोनवणे याने दादाजी यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. दादाजी यांचा चेहरा विद्रूप व्हावा, यासाठी त्याने दगडाचा वापर केला आणि तो तिथून फरार झाला. मात्र पोलिसांनी या घटनेची खात्री करण्यासाठी मयत व्यक्तीच्या घरी भेट दिली असता तो व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होता.