गडचिरोली जिल्हा पोलिसांनी जहाल नक्षलवादी डीव्हीसी पवन याला अटक केली असून त्याच्यासोबत असलेल्या दोन महिला नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्हा पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली परिसरातील बालिकांची दिशाभूल करून त्यांना नक्षल चळवळीत सहभागी करून घेतले जात होते, अशी माहिती सोनी दसरू कोवासे व अन्य एक बालिका सदस्याच्या अटकेतून समोर आली आहे. त्या छत्तीसगड राज्यात परसेगड नक्षल दलममध्ये कार्यरत होत्या.

त्यांनी नक्षल चळवळीतील त्रासाला कंटाळून गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. नक्षल बालिका सदस्याला बालकल्याण समिती समोर हजर केले असता बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून नक्षल संघटनेचा डीव्हीसी दिलीप, परसेगड दलम कमांडर मंगी पुनेम, डीव्हीसी पवन उर्फ सोमा वेलादी याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३, ३४ व बाल संरक्षण कायदा २०१५ च्या कलम ८३ नुसार गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानुसार आरोपी डीव्हीसी पवनला अटक करण्यात आलेली असून त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. नक्षलवादी हे बालकांना बळजबरीने पळवून नेतात व लहान मुलांचे शोषण करून त्यांना नक्षल दलममध्ये काम करण्यास भाग पाडतात.

यावरून नक्षलवादी हे बालकांच्या मानवाधिकारांचे कशा प्रकारे उल्लंघन करतात, हे पुन्हा एकदा या घटनेने सिध्द झाले आहे. यापूर्वी सुध्दा लाहेरी परिसरात नक्षलवाद्यांनी तीन शाळकरी मुलींना शाळेतून बळजबरीने पळवून नेले होते व त्यांना नक्षल दलममध्ये भरती करून घेतले होते. मागील वर्षी सांड्रा जंगल परिसरात चकमकी दरम्यान दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. तसेच एप्रिल महिन्यात तीन नक्षलवाद्यांना या परिसरातून अटक करण्यात आलेली होती.

गेल्या काही दिवसात सांड्रा परिसरात पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात कारवाया केलेल्या असून अनेक जहाल नक्षलवाद्यांना अटक तसेच आत्मसमर्पण करीत असल्याने या परिसरातील नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. या दोघीही छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्हय़ातील आंबोली या गावच्या राहणाऱ्या आहेत.

पवनवर १६ लाखांचे बक्षीस

महाराष्ट्र, ओडिसा, छत्तीसगड राज्यांमध्ये नक्षल दलममध्ये कार्यरत असलेला जहाल नक्षल डीव्हीसी सदस्य पवन उर्फ सोमा फोदा वेलादी (३५) रा. परसेगुंडी, ता. भोपालपट्टनम जि. बिलापूर छत्तीसगड याच्यावर १६ लाख रुपयांचे रोख बक्षीस आहे. त्याला अटक करण्यात आल्याने नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला असून गडचिरोली पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे.