पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह

नक्षल कमांडर व चळवळीतील वरिष्ठ नेत्यांना आम्ही पैसे देऊन खरेदी केले आहे, त्यामुळे आमचे आता कुणी काही बिघडवून शकत नाही, अशी मग्रुरीची भाषा करीत चळवळ पैशाला विकली गेली, अशी बदनामी लॉयड मेटल्स व्यवस्थापनाने सुरू केल्याने संतापलेल्या ३०-३५ नक्षलवाद्यांनी ७८ वाहने काही मिनिटात जाळून टाकल्याची माहिती आहे. दरम्यान, सूरजागड पहाडीपासून हेडरी पोलीस ठाणे काही किलोमीटरवर असतांनाही नक्षलवाद्यांनी जाळपोळ सुरू असतांना पोलिस नेमके कुठे होते, हाही प्रश्न यानिमित्ताने सर्वाना पडला आहे.

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड पहाडावर लॉयड मेटल्स कंपनीने लोहखनिजाचे उत्खनन सुरू केल्यावर प्रथमच नक्षलवाद्यांनी आक्रमक होऊन शुक्रवारी पहाटे ७८ वाहने जाळली. यानंतर शनिवारी सूरजागड पहाडावर प्रत्यक्ष पाहणी केल्यावर तेथे मिळालेल्या माहितीनुसार लॉयड मेटल्स व्यवस्थापनाने नक्षल चळवळीची बदनामी सुरू केल्यामुळेच ही जाळपोळ झाली आहे. या कंपनीला कॉंग्रेस आघाडी सरकारने सूरजागड येथे लोहखनिजाचा ब्लॉक वितरित केला होता. मात्र, नक्षल्यांच्या दहशतीमुळे उत्खनन सुरू झाले नव्हते. दरम्यान, केंद्र व राज्यात भाजपची सत्ता येताच लॉयडने पुन्हा उत्खननासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना तशी परवानगीही मिळाली. परंतु लॉयड व्यवस्थापनाने मग्रुरीची भाषा सुरू केली. त्यामुळे नक्षलवाद्यांनी वाहने जाळली.

जहाल साईनाथ व भास्करच्या नेतृत्वाखाली जाळपोळ

छत्तीसगडमधून खास नक्षलवादी सूरजागड पहाडावर आल्याची माहिती आहे. तसेच पेरमिली व गट्टा दलमचा यात सक्रीय सहभाग असल्याचे बोलले जात आहे. गट्टा दलमचा कमांडर भास्कर व पेरीमिली दलमचा उपकमांडर साईनाथ यांच्या नेतृत्वाखाली ही जाळपोळ करण्यात आली, अशीही माहिती सूत्रांनी दिली. कारण, पेरीमिली दलम कमांडर साईनाथ यालाच लॉयड मेटल्स कंपनीने पैसे दिले होते, अशी चर्चा आहे.