News Flash

नक्षलवाद्यांना घरचा अहेर

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज जाळून काळा झेंडा फडकवण्याच्या उद्देशाने एका गावात गेलेल्या नक्षलवाद्यांना त्यांच्याच समर्थकांनी राष्ट्रध्वज जाळण्यास नकार दिल्याने अपमानित व्हावे लागले.

| January 30, 2014 12:44 pm

नक्षलवाद्यांना घरचा अहेर

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज जाळून काळा झेंडा फडकवण्याच्या उद्देशाने एका गावात गेलेल्या नक्षलवाद्यांना त्यांच्याच समर्थकांनी राष्ट्रध्वज जाळण्यास नकार दिल्याने अपमानित व्हावे लागले. या घटनेमुळे एटापल्ली तालुक्यातील गडेरी गाव एकदम प्रकाशझोतात आले आहे.
भारतीय राज्य घटनेवर विश्वास नसलेले नक्षलवादी दरवर्षी १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला राष्ट्रध्वज जाळून काळा झेंडा फडकावतात. देशाच्या संविधानाचा निषेध करण्याची ही चळवळीची पद्धत आहे, असे नक्षलवादी पत्रकबाजी करून नंतर सांगत असतात. त्यामुळे या चळवळीचा प्रभाव असलेल्या भागात सुरक्षा दलांना या दोन राष्ट्रीय सणांच्या दिवशी दुर्गम भागात मोठा बंदोबस्त ठेवावा लागतो. हा बंदोबस्त असताना सुद्धा नक्षलवादी दरवर्षी एक दोन ठिकाणी तरी हे कृत्य करतात. यावेळी मात्र शेजारच्या गडचिरोली जिल्हय़ात नक्षलवाद्यांना या मुद्यावरून त्यांच्याच समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गेल्या २२ जानेवारीला नक्षलवादी एटापल्लीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गडेरी गावात गेले. तेथे स्वागतासाठी मिलेशिया या नावाने ओळखले जाणारे त्यांचे समर्थक हजर होते. नक्षलवाद्यांनी रात्री गावात बैठक घेऊन २६ जानेवारीला गावातील शाळेवर फडकणारा राष्ट्रध्वज खाली काढा, नंतर तो जाळा व त्याऐवजी काळा झेंडा फडकवून सरकारचा निषेध करा, असा आदेश दिला. बंदुकीच्या धाकावर दिलेला हा आदेश गावकरी निमूटपणे पाळतील, या भ्रमात असलेल्या नक्षलवाद्यांना त्यांच्या समर्थकांनी हे देशविरोधी कृत्य करण्यास नकार दिल्यानंतर फार मोठा धक्का बसला.

गावावर कौतुकाचा वर्षांव
गेल्या अनेक वर्षांपासून या चळवळीच्या समर्थनार्थ काम करणाऱ्या गावातील नागरिकांनी देशाचा राष्ट्रध्वज का जाळायचा? असा सवाल केला. नक्षलवाद्यांनी नंतर माओची महती गायला सुरुवात केली, पण गावकरी या प्रश्नावर ठाम होते. अखेर त्यांचेच समर्थक झेंडा जाळायला तयार नाहीत हे बघून नक्षलवाद्यांनी थोडे नमते घेत ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकणार आहे त्याच्या बाजूलाच काळा झेंडा फडकवा, अशी विनंती समर्थकांना केली. समर्थकांनी ही विनंती मान्य केली. २६ जानेवारीला या गावात राष्ट्रध्वजही फडकला व त्याच्या बाजूला काळा झेंडा सुद्धा फडकला. या दिवशी शोध मोहिमेवर असलेल्या सी-६० च्या जवानांना या गावात गेल्यावर हा विरोधाचा प्रकार कळला. या जवानांनी काळा झेंडा काढून फेकला व दिवसभर गावात हजर राहून राष्ट्रध्वजाचे रक्षण केले. या घटनेची माहिती पोलीस दलातील वरिष्ठांना कळताच आता सर्वाकडून या गावावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. राष्ट्रध्वजाच्या संदर्भात एखाद्या गावाने थेट नक्षलवाद्यांशी वैर घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2014 12:44 pm

Web Title: naxal supporters refuse to burn national flag
टॅग : National Flag,Naxal
Next Stories
1 सप्तशृंग घाटात जीप कोसळून तीन ठार
2 वडखळ परिसरात काविळीची साथ
3 एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास घरकुलांच्या किंमतीत दोन लाखापर्यंत वाढ
Just Now!
X