29 September 2020

News Flash

नक्षलवाद्यांच्या दहशतीचे ग्रामपंचायत निवडणुकीवर सावट

नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्हय़ातील अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या चार तालुक्यांतील ४३ ग्रामपंचायतींमध्ये एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.

| April 12, 2015 05:34 am

नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्हय़ातील अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या चार तालुक्यांतील ४३ ग्रामपंचायतींमध्ये एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांची २२५ पदे रिक्त राहणार आहेत. निवडणूक जाहीर होतच नक्षलवाद्यांनी बॅनर, पोस्टर, पत्रकांच्या माध्यमातून ग्राम पंचायत निवडणुकीत सहभागी झाल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी गावकऱ्यांना दिली होती. त्याचाच परिणाम झाला असल्याचे बोलले जात आहे.
गडचिरोलीतील ३४० ग्रामपंचायतींमध्ये मे ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत निवडणुका घेण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २४ व ३० एप्रिल या पहिल्या टप्प्यात अहेरी, एटापल्ली, भामरागड, व सिरोंचा या चार क्षेत्रातील ७१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ४३ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक २४ एप्रिल रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ३० एप्रिल रोजी कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी व मूलचेरा या आठ तालुक्यांच्या क्षेत्रातील २६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४० ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात अहेरी उपविभागातील ग्राम पंचायत निवडणुकीसाठी ४ ते ९ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. यात ११० ग्राम पंचायतींपैकी तब्बल ४३ ग्राम पंचायतमध्ये एकाही उमेदवाराचा अर्ज प्राप्त झालेला नाही. या विभागात ७१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. मात्र नऊ ग्रामपंचायतीतील नागरिकांनी उमेदवारी अर्ज सादर न करून निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. या निवडणुकीसाठी सिरोंचा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी सर्व २३९ जागांसाठी ५६६ अर्ज प्राप्त झाले. अहेरी तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींमध्ये २३१ जागांसाठी ७३८ अर्ज प्राप्त झाले. मात्र कोंजेड ग्रामपंचायतीमध्ये एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. एटापल्ली तालुक्यातील १४ ग्रामपंचायतमध्ये १४४ जागांसाठी २७३ अर्ज प्राप्त झाले. मात्र जांभिया, गट्टा, कांदोळी व वांगेतुरी या चार ग्रामपंचायतींमध्ये कुणीही अर्ज दाखल केला नाही. भामरागड तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये ५४ जागांसाठी ६० अर्ज सादर करण्यात आले. मात्र इरूकडम्मे, नेलगुंडा, कुव्वाकोडी व परायणार या ग्रामपंचायतमध्ये एकही अर्ज आला नाही.
पोटनिवडणुकीत तर ३४ ग्रामपंचायतीतील लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अहेरी तालुक्यात दहा ग्रामपंचायतीतील ३७ जागांसाठी पोटनिवडणूक होत असून एकही उमेदवार अर्ज भरण्यासाठी समोर आला नाही. यात रेगुलवाही, आरेदा, खांदला, वट्रा, उमानूर, राजाराम, किष्टापूर, कुरूमपल्ली, मांड्रा व आवलमरी या ग्रामपंचायतचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यातील १३ ग्रामपंचायतमध्ये ७७ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यातील ३ ग्रामपंचायतसाठी १४ अर्ज प्राप्त झाले. मात्र जवेली बु. जवेली खु, कोकेवाडा, कोटमी, घोटसूर, कोहका, गर्देवाडा, मेंढरी, मानेवारा व सेवारी येथे अर्ज आलेले नाहीत. सिरोंचा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतमध्ये ३४ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. परंतु ३ ग्रामपंचायतसाठी ४ अर्ज प्राप्त झाले. टेकलामोटला, पातागुडम, पोर्लामाला, सोमनपल्ली, कोटापल्ली, बेजूरपल्ली, नडीकुडा व कोचमपल्ली या आठ ग्रामपंचायतीत एकही अर्ज आला नाही. भामरागड तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीतील ५३ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत ३ ग्रामपंचायतसाठी केवळ तीन अर्ज आले. देवाडा, बोटनफुंडी, मडवेली, कोटरी, दिरंगी व कोठी या सहा ग्रामपंचायतीत एकही अर्ज नाही. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळेच गडचिरोलीत ही स्थिती निर्माण झाल्याने २२५ ग्रामपंचायत सदस्य पदे रिक्त राहणार आहे. ग्राम पंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच नक्षलवाद्यांनी गावा गावात बॅनर, पोस्टर, पत्रकांच्या माध्यमातून गावकऱ्यांना धमकावने सुरू केले आहे. निवडणुकीत भाग घेतला तर प्रसंगी ठार करण्याची धमकी दिली आहे. जीवाच्या भीतीपोटीच गावकऱ्यांनी लोकशाही बळकट करण्याऐवजी नक्षलवाद्यांचे हात बळकट केले आहे. नक्षलवाद्यांची ही दहशत फार काळ टिकणार नाही, असा दावा गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने केला जात असला तरी दंडकारण्यात सध्या नक्षलवाद्यांची दहशत कायम असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 5:34 am

Web Title: naxal threat ahead gram panchayat election
Next Stories
1 जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
2 अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला अटक
3 खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापुरात न्यायालयाला टाळे
Just Now!
X