कुसुमाग्रज स्मारकात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा गोंधळ

प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना अवमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित सहगल यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तयार केलेल्या भाषणाचा अभिवाचन कार्यक्रम हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उधळण्याचा प्रयत्न केला. आयोजकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. काही वेळाने त्यांना सभागृहाबाहेर नेण्यात आले. नंतर सहगल यांना दिलेल्या अवमानास्पद वागणुकीच्या निषेधाचा ठराव करण्यात आला.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यरक्षण निर्धार मंचच्यावतीने सहगल यांच्या समर्थनार्थ त्यांच्या भाषणाच्या अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिष्ठानचे किशोर पाठक, लोकेश शेवडे, विश्वास ठाकूर, चंद्रकांत महामिने यांच्यासह साहित्य, सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. प्रारंभी दीपा पळशीकर यांनी सहगल यांच्या भाषणाचे अभिवाचन केले. नंतर काही जणांना बोलण्याची संधी देण्यात आली. सहगल यांना दिलेली वागणूक साहित्य जगतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी असल्याचा सूर उमटला. यावेळी एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांने बोलण्याची परवानगी मागून ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतला. संबंधिताने सहगल यांच्याविषयी उपस्थितांनी मांडलेल्या भावनांवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली. नंतर सहगल यांचा कौटुंबिक वारसा कथन करत त्यांच्या साहित्यावरच त्याने आक्षेप घेतला. अकस्मात घडलेल्या घटनाक्रमाने सभेत गोंधळ उडाला. काही मिनिटे संबंधिताने आपले बोलणे सुरूच ठेवले. आयोजकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर सभागृहातील अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करू नका, असा आरडाओरड करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आपले विचार मांडण्याचे हे व्यासपीठ नसल्याचे सांगूनही गोंधळींनी दुर्लक्ष केले. अखेर काही ज्येष्ठांनी मध्यस्ती करत संबंधितांना बाहेर नेले. तेव्हा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आयोजकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या घडामोडीनंतर सहगल यांना दिल्या गेलेल्या वागणुकीबद्दल निषेधाचा ठराव मांडून सभा आटोपण्यात आली.