जलयुक्त शिवाराचं बिंग फुटेल म्हणून दुष्काळग्रस्त गावामध्ये टँकर दिले जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी चाळीसगाव येथील जाहीर सभेत सरकारवर केला. जळगाव जिल्हयासह राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे परंतु सरकार त्याठिकाणी काहीच दिले नाही. अरे पाण्यावाचून जनतेने जगायचं कसं असा संतप्त सवालही अजितदादा पवार यांनी सरकारला केला.
शेतकऱ्यांची नाडी ओळखणारे, तुमचे आमचे नेते शरद पवार कृषी मंत्री असते तर आज शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली नसती. साहेबांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली आणि आज किती लोकांना कर्जमाफी मिळाली असा सवालही अजितदादा पवार यांनी केला. पाण्यावाचून युध्द होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे आणि आज तशी स्थिती उद्भवते की काय अशी भीतीही अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.
आर.आर.आबांनी डान्सबार पुन्हा सुरु होणार नाही असा कायदा केला. हा कायदा समाजाच्या भल्यासाठी, तरुण पिढीच्या भल्यासाठी केला परंतु भाजप सरकारने डान्सबारबाबतची बाजू कोर्टात नीट मांडली नसल्याने पुन्हा डान्सबार सुरु होणार आहेत. भाजपाने हा काळा दिवस पाहायला लावला असल्याचा आरोप अजितदादा पवार यांनी केला.
सुरुवातीला अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली शिवाय माजी उपमुख्यमंत्री आबांनाही श्रध्दांजली वाहिली. तुम्ही बंद केलेले डान्सबार पुन्हा या फसव्या सरकारने कोर्टात मजबुत बाजू मांडली नसल्याने पुन्हा सुरु झाल्याचे सांगतानाच आबांची जाहीर माफी मागितली.
लोकांना फसवण्याचा… बनवण्याचा… आणि गाजरं दाखवली जात आहेत. खाजगी आयुष्यावर गदा आणली जात आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे. इंग्रजांच्या पारतंत्र्यापेक्षा फार गंभीर पारतंत्र्य या सरकारच्या काळात सुरु असून त्यासाठी परिवर्तन झालेच पाहिजे हे सरकार गेलेच पाहिजे असे आवाहनही अजितदादा पवार यांनी केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 18, 2019 3:40 pm