ऑपरेशन लोटस किंवा ऑपरेशन कमळ हा शब्द आपण अनेकदा भाजपा नेत्यांच्या तोंडून ऐकला आहे. हे ऑपरेशन कमळ किंवा ऑपरेशन लोटस म्हणजे काय? हे आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच सांगितलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय. या मुलाखतीत संजय राऊत यांनी ऑपरेशन कमळ म्हणजे काय? असा प्रश्न विचारताच शरद पवार यांनी उत्तर दिलं.

काय म्हणाले शरद पवार?
” ऑपरेशन कमळ याचा अर्थ सरळसरळ सत्तेचा गैरवापर करुन लोकांनी निवडून दिलेली सरकारं दुबळी करणं. त्यासाठी केंद्रातल्या सत्तेचा पुरेपूर वापर करणं”

महाराष्ट्रात येत्या ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन कमळ होईल असं सातत्याने पसरवलं जातंय.. असा प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले “हो पहिल्यांदा त्यांनी तीन महिन्यात सांगत होते. आता सरकारला सहा महिने झाले. त्यानंतर सप्टेंबरचा वायदा आहे, काही लोक ऑक्टोबर महिन्याचा वायदाही करत आहेत. मात्र मला खात्री आहे की पाच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार उत्तमरित्या राज्याचा कारभार करेल. ऑपरेशन कमळ असो किंवा आणखी काही असो याचा काहीही परिणाम उद्धव ठाकरेंच्या सरकारवर होणार नाही.”

आणखी वाचा- …म्हणून आम्ही २०१४ साली भाजपाला बाहेरुन पाठिंबा दिला : शरद पवार

आणखी वाचा- सत्ता गेली, पण अस्वस्थता नाही; शरद पवार यांचा फडणवीस यांना टोला

महाराष्ट्रात मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष महायुती म्हणून लढले होते. निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर भाजपाला १०५ जागा तर शिवसेनेला ५४ जागा मिळाल्या. महाराष्ट्राच्या जनतेने खरंतर महायुतीला कौल दिला होता. मात्र मुख्यमंत्रीपदासहीत सत्तेचं समान वाटप यावरुन दोन्ही पक्षांमध्ये कमालीचे मतभेद झाले. या मतभेदानंतर दोन्ही पक्ष वेगळे झाले.  ज्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार उदयास आलं.  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं तीन पक्षांचं सरकार राज्यावर आलं. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

आणखी वाचा- “मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस लोकांना माहित झाले”; ‘त्या’ प्रश्नावरुन पवारांचा टोला

या सगळ्या घडामोडी राज्यात घडल्यानंतर हे सरकार फार काळ टीकणार नाही, महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ राबवलं जाईल अशा घोषणा भाजपाच्या नेत्यांनी केल्या. हाच संदर्भ घेऊन ऑपरेशन कमळ म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला, ज्याचा अर्थ शरद पवार यांनी उलगडून सांगितला.