पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ दौऱ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकास्त्र सोडले आहे. देशाचे पंतप्रधान भगवे कपडे घालून सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुहेत जाऊन बसले होते, हे देशाने पाहिले. जग कुठे चाललंय, आधुनिक विज्ञानात काय सुरु आहे आणि आम्ही गुहेत जाऊन बसतो, नव्या पिढीसमोर तुम्ही कोणता आदर्श ठेवताय, अशा शब्दात शरद पवारांनी मोदींवर टीका केली आहे.

शरद पवार यांनी गुरुवारी पिंपरी- चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात शरद पवार यांनी मोदींवरही टीका केली. लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ दौऱ्यावर गेले होते. केदारनाथमध्ये मोदी गुहेत जाऊन ध्यानाला बसले होते. याचा दाखला देत शरद पवारांनी मोदींवर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात  शरद पवार यांना पाचव्या रांगेतील पास दिल्याने मानापमानाचे नाट्य घडले होते.  “मी आजही परत चौकशी केली. माझ्या सचिवाने सेक्रेटरींना संपर्क केला. ते स्वतः त्या ठिकाणी माझी सीट विचारण्यासाठी गेले होते. तेव्हा माझी सीट पाचव्या रांगेत असल्याचं सांगण्यात आलं. त्याचा नंबरही होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा गेले, यानंतर अधिक पुढचा पास दिला गेला. पण पाचवी रांगच सांगितली होती. माझ्या कार्डवर व्ही लिहिलं होतं”, असे शरद पवारांनी सांगितले. एवढा मोठा कार्यक्रम असल्याने अगोदर जाऊन चौकशी केली जाते. कुठून जायचं कुठल्या गेटने जायचं, सर्व गेट सर्वांना खुली नसतात. सचिवांना सांगताना दोन्ही वेळेला दुसरी रांग सांगितली. पण हा फार महत्वाचा प्रश्न नाही. काही गैरसमज झाला असेल तर तो सोडून द्यायचा. हा काही वादाचा प्रश्न नाही. कदाचित माझ्या ऑफिसची कमतरता असावी, असे सांगत शरद पवारांनी या वादावर पडदा टाकला.