पाथर्डीमध्ये ११९ टँकर सुरू आहेत. याठिकाणी लोकं मागतात चारा व छावण्या…सरकार देतेय डान्सबार आणि लावण्या… बाईला नाचवा आणि गाईला वाचवा असे हे भाजप सरकार असल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी पाथर्डी येथील जाहीर सभेत केली.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शैलीत आजही भाजपवर शरसंधान साधले. शेतकऱ्यांच्या विम्यापोटी ५५ हजार कोटीचा फायदा अंबानीच्या विमा कंपनीला झाला आहे असे अहवालातून समोर आले आहे. अक्षरशः तुमचा पैसा लुटण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोपही आमदार छगन भुजबळ यांनी केला.

घर भाड्याने देताना त्याचे कुटुंब विचारले जाते परंतु ज्याची फॅमिलीच नाही त्यांना देशच देवून टाकला आहात अशी पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवली. शेतकऱ्यांना द्यायचं तर खुल्या मनाने द्या ना परंतु हे काहीच देत नाही उलट आपल्याकडून घेतले जाते आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.

माझं तोंड बंद करण्यासाठी मला जेलमध्ये टाकले. माझं सगळं जप्त केले. आता कपड्यावर आहे. परंतु तुम्ही माझ्या जनतेचे प्रेम कधीच जप्त करु शकत नाही. मी बोलणार मला बोलण्यापासून रोखू शकत नाही असा इशाराही आमदार छगन भुजबळ यांनी दिला.