जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना विरोधीपक्ष नेते धनजंय मुंडे यांची जीभ घसरली आहे. चार दिवसानंतर पूरस्थितीची पाही करायला गेले, महापुरात सेल्फी काढणाऱ्या गिरीश महाजनला जोडयानं हाणलं पाहिजे, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शिवस्वराज्य यात्रेत गिरीश महाजन यांच्यावर तोफ डागली आहे.

पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले असताना गिरीश महाजन यांचा सेल्फी व्हिडीओला हसून दाद देतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं होते. विरोधकांनी त्यावेळी महाजन यांच्यावर टीका केली होती. हजारो लोक पुरात अडकले असताना मंत्री आनंदात आहेत का? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता.

राज्य पूर परिस्थितीमुळे संकटात सापडले मात्र जनतेची मदत करण्याची दानत या सरकारमध्ये दिसली नाही. या सरकारला जमतं ते फक्त फसवेगिरी. असे म्हणत मुंडे यांनी सरकारवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात झाली असून यानिमित्ताने बोलताना धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. सामान्य माणसाला आधार कुणी दिला तर तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे याचा मला अभिमान आहे असं यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

“भाजपाचे नेते चंद्रकात पाटील यांना पुरग्रस्त भागात लोक विचारणा करतील, जाब विचारतील म्हणून कोल्हापूर येथे १४४ कलम लावले होते”, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. “फडणवीस – ठाकरेंच्या सरकारने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. मात्र आताच्या यात्रेत त्यांना छत्रपतींचा आशिर्वाद नको आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकांची एक वीटही रचली नाही तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम केलेले नाही”, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.