26 February 2021

News Flash

वाढदिवसानिमित्त रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

शरद पवारांचा आहे ८० वा वाढदिवस

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. या निमित्तानं त्यांच्यावक सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शरद पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत असं म्हणत त्यांना वाढदिवसाच्या सुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीदेखील त्यांना महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड असं म्हणत शुभेच्छा दिल्या.

“महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा,” असं ट्विट रोहित पवारांनी केलं. तसंच रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांना एक पत्रही दिलं. या पत्राद्वारे त्यांनी शरद पवारांना भावनिक साद घातली आहे.

काय म्हटलंय पत्रात?

आज तुम्ही ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहात. तुमचा वाढदिवस म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक आनंदोत्सव असतो. यानिमित्त तुम्हाला काय भेट द्यावी, असा खूप विचार केला, पण काही सुचत नव्हतं. तुमची वाचनाची आवड पाहून एखादं पुस्तक भेट देण्याचा विचार केला पण तुमचा व्यासंग पाहता ते तुम्ही आधीच वाचलेलं असेल अशी मला खात्री आहे आणि तुम्ही स्वतःच एक चालता-बोलता संदर्भ ग्रंथ आहात म्हणून पुस्तकाचा विचार मागे पडला आणि यंदाच्या दिवाळीत तुम्ही तुमच्या आईला म्हणजेच माझ्या पणजीला (कै. शारदाबाई पवार) यांना लिहिलेलं पत्र अचानक आठवलं. यातून तुमच्या जडणघडणीत आई-वडलांचं जे स्थान आहे, याबाबतच्या हृद्य भावना आमच्यापर्यंत पोहचल्या. खरंतर तुमच्याबाबतही माझ्या मनात अशाच भावना आहेत, या भावना मांडाव्यात असा विचार मनात आला आणि तुमच्याबद्दल नेहमीच एक आदरयुक्त भिती  वाटत असल्याने माझ्या भावना पूर्णपणे आणि खुलेपणाने व्यक्त करता येणार नाहीत, म्हणून मी हे पत्र लिहितोय. यात काही चूक झाली तर आपण मला माफ कराल, असा विश्वास आहे. कदाचित काही लोक म्हणतील की असं जाहीर पत्र लिहिण्याची काय गरज आहे? पण तुमचं संपूर्ण आयुष्यच सार्वजनिक असल्याने आणि पत्रासारखं दुसरं सुंदर माध्यम नसल्याने वाढदिवसानिमित्त मी माझ्या भावना या पत्रातून मांडतोय.

आपण पक्षाचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक, गुरू, मित्र आणि आजोबा या सगळ्याच भूमिकेत असल्याने आपल्या मार्गदर्शनाखाली माझी जडणघडण होत आहे. तुमच्यासोबत प्रवास करण्याची आणि वेळ घालवण्याची संधी मला ब-याचदा मिळते. या वेळी सार्वजनिक जीवनात तुम्ही घेत असलेले निर्णय, घरच्या आणि बाहेरच्या मंडळींसोबत संवाद साधताना, लोकांच्या अडचणी सोडवताना, वेगवेगळे निर्णय घेताना तुम्हाला लहानपणापासून मी जवळून पाहत आलोय.

सक्षम करणं ही व्यापक भूमिका

सर्वसामान्य, वंचित घटकाला सक्षम करणं ही तुमची व्यापक भूमिका नेहमीच राहिलीय. व्यक्तिगत हिताचा तुम्ही कधी विचार केला नाही आणि करतही नाही, ही तुमच्याकडून मला मिळालेली मोठी शिकवण आहे. तुमचं कुटुंब हे फक्त पवार नावापुरतं कधी मर्यादित राहिलं नाही तर तुमच्या कुटुंबाचा परीघ हा प्रचंड मोठा आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या कुटुंबाचाच सदस्य आहे. तुमच्या अफाट कार्यक्षमतेचा तर मला नेहमीच हेवा वाटतो. तुम्ही कृषिमंत्री असताना काही काळ दिल्लीत तुमच्यासोबत राहण्याची संधी मला मिळाली. तेंव्हाही मी पाहिलं की दिल्लीतही तुमचा दिवस सकाळी ६ वाजताच सुरू होऊन लोकांसाठी तुमच्या कार्यालयाचे दरवाजे खुले होत होते. एखाद्याला तुम्हाला भेटायचं असेल तर त्या व्यक्तिकडं एखादं पद असायलाच पाहिजे असं नाही तर आजही कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती ही थेट तुम्हाला भेटू शकते आणि असंच वागण्याचा मीही प्रयत्न करतोय.

अहोरात्र काम करण्याची ऊर्जा

राज्यात महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून चांद्यापासून बांद्यापर्यंत वेगवेगळ्या कामांचा पाठपुरावा करताना मी आपल्याला पाहतो. या वयात काम करण्याचा तुमचा उरक पाहिला तर आपण कुठे आहोत, असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. आज वयाच्या ८० व्या वर्षीही १८ वर्षे वय असल्याप्रमाणे तुम्ही काम करता. लोकांसाठी अहोरात्र काम करत असताना तुमच्यात ही ऊर्जा नेमकी येते तरी कुठून?

अनेत नेते घडवले

साहेब तुम्ही अनेक नेते घडवले, तसं आपल्या कुटुंबातही तुमच्या मार्गदर्शनाखाली दोन दिग्गज नेते घडले ते म्हणजे आदरणीय अजितदादा आणि आदरणीय सुप्रियाताई. हे दोघेहीजण राज्याच्या हिताचं काम करताना पाहून अत्यंत समाधान वाटतं आणि तुमच्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळतेय, हे मी माझं भाग्य समजतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या परिवाराच्या सर्वात जवळचा विषय असलेल्या शेती क्षेत्रात काम करण्याचा निर्णय जेंव्हा मी घेतला तेंव्हा तुम्ही मला पंजाब, दिल्ली, ब्राझील अशा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या कृषिविषयक कार्यक्रमांना घेऊन गेला होतात. त्याचा मतदारसंघात काम करताना आणि शेतकऱ्यांना मदत करताना मला मोठा फायदा होतोय. तुमच्या प्रत्येक सहवासातून तुमची काम करण्याची, लोकांशी संवाद साधण्याची पध्दत, अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची हातोटी हे सर्व शिकायला मिळालं. तुमच्या नेहमीच व्यस्त दिनक्रमामुळं तुम्हाला दिवसभर पाण्याचे दोन घोट घेण्यासाठीही अनेकदा उसंत मिळत नाही. रात्री उशिरापर्यंत तुम्ही कामात असता, तरीही काम संपल्यानंतर स्वतःचा विचार न करता आधी स्वीय सहाय्यक, गाडीचे चालक, सुरक्षा कर्मचारी यांचं जेवण झालं का? अशी विचारपूस करता आणि हा तुमचा हाच शिरस्ता अनेक वर्षांपासून कायम आहे! लोकांशी कसं बोलायचं यापासून तर त्यांचं काम होण्यासाठी कसे प्रयत्न करायचे आणि तरीही एखादं काम होत नसेल तर संबंधितांना ते कसं समजून सांगायचं, हे मी खूप जवळून पाहिलं, अनुभवलं. एखाद्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करूनच त्या विषयावर काम करणं ही शिकवण तुम्ही मला दिलीत. तुमच्यासोबतचा प्रत्येक मिनिट हा माझ्यासाठी एकप्रकारे ‘साहेब’ नावाच्या गुरुकुलात एक शिष्य म्हणून व्यतीत केल्यासारखा आहे. शहर असो किंवा ग्रामीण भाग या दोन्ही ठिकाणी सर्वसामान्य नागरिक रहात असल्याने त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं, हे तुम्हीच मला शिकवलं. ग्रामीण भागासाठी काम करत असताना तुम्ही शहरांकडं दुर्लक्ष होऊ दिलं नाही, हा तुमच्या सर्वसमावेशक राजकारणाचा पाया राहिला. एकवर्षी देशात पाऊस कमी पडणार, अशी माहिती तुम्हाला हवामान तज्ज्ञांकडून मिळाली तेंव्हा आपल्या देशातील शेतकरी आणि मध्यमवर्गीय अडचणीत येऊ शकतात, या विचाराने सत्तेत नसतानाही तुमच्या चेहऱ्यावर पसरलेली काळजी मला आजही आठवतेय. राजकारणापलीकडील ही तुमची विचारसरणी मला खूपच भावतेय. तुम्ही अनेकदा व्यक्तिगत राजकीय नुकसान सहन केलं पण स्वार्थासाठी कधी सामाजिक हिताचा बळी दिला नाही. तुमची ही व्यापक विचारसरणी मी कधीही विसरु शकत नाही.

प्रेरणा घेऊन जिल्हा परिषदेपासून काम

मला चांगलं आठवतंय गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तुमच्यासोबत हेलिकॉप्टरने पुण्याहून सोलापूरकडे जात होतो, तेंव्हा आपण कोणत्या तालुक्यात आहोत, गाव कोणतं आहे, तिथलं वैशिष्ट्य काय, त्या तालुक्यातील पिकं कोणती, तिथल्या समस्या कोणत्या, सिंचनाच्या पाण्याची काय स्थिती आहे, अशा बारीक-सारीक गोष्टी तुम्ही मला सांगत होतात. एवढा बारकाईने अभ्यास हा काही फक्त हेलिकॉप्टरमधून फिरल्याने होत नाही तर त्यासाठी जमिनीवरचं काम आणि प्रश्नांचा मुळातून अभ्यास लागतो. महाराष्ट्राची आपल्याला तळहाताच्या रेषांप्रमाणे खडानखडा माहिती आहे आणि त्याचं कारण म्हणजे गेल्या साठ वर्षांपासून तळागाळात केललं काम हे आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. यातूनच प्रेरणा घेऊन आपणही तळागाळातून काम केलं पाहिजे म्हणून मीही जिल्हा परिषदेपासून कामाला सुरूवात केली.

उदंड प्रतिसाद अवर्णनीय

तुमचा अनुभव आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य संपूर्ण देशाला माहीतच आहे, पण गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील तरुणांनी तुम्हाला जो उदंड प्रतिसाद दिला, तो अवर्णनीय असा होता. राजकारणापासून चार हात दूर असलेल्या तरूणांसाठीही तुम्ही ऊर्जास्रोत आणि आदर्श बनलात. तुम्ही आमच्यासाठी विद्यापीठ आहात, ज्ञानाचा वटवृक्ष आहात. तुमच्याकडं दांडगा अनुभव आहे. मी माझ्या कामानिमित्त बऱ्याचदा तरुणांना भेटत असतो, त्यामुळं त्यांच्या अपेक्षा मला माहित आहेत. आपल्या दांडग्या अनुभवाची शिदोरी आज या तरूण वर्गाला शिकण्यासाठी हवीय. मग ती लेखाच्या अथवा पुस्तकाच्या माध्यमातून असो किंवा तरुणांसोबत संवाद साधण्याच्या एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असो, आपण ती द्यावी, अशी या तरुण वर्गाचा एक प्रतिनिधी म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे.

तुम्ही आयुष्यभर वेगवेगळ्या माध्यमातून सर्व स्तरातील लोकांना जोडत गेलात. सार्वजनिक जीवनात काम करत असताना आपण चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असलं पाहिजे, हा गुण तुमच्याकडूनच घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा मीही प्रयत्न करतोय. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकाचं काम झाल्यानंतर जेंव्हा तो एखादा आभाराचा फोन किंवा एसएमएस करतो तेंव्हा दिवसभर केलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतं आणि तुमच्या आत्मचरित्रातील ‘लोक माझे सांगाती’ या शीर्षकाची प्रचिती येते.

प्रामाणिकपणे काम

साहेब, जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारकीच्या माध्यमातून मला तुम्ही आणि पक्षाने लोकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलीत. त्यामुळं मी प्रामाणिकपणे हे काम करतोय आणि पुढंही असंच काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. पण तुम्ही आजवर जेवढं काम केलं त्या तुलनेत अगदी काही प्रमाणात जरी मी माझ्या आयुष्यात काम करू शकलो तरी सार्वजनिक जीवनात काम करण्याचा माझा निर्णय योग्य होता असं मी म्हणेन आणि याचं निर्विवाद श्रेय हे तुमचं असेल, यात शंका नाही. साहेब आपणास वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड आयुष्य लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 1:35 pm

Web Title: ncp leader rohit pawar gandson of sharad pawar writes emotional letter on his 80th birthday jud 87
Next Stories
1 कुणीही कुणाबरोबर गेलं, तरीही मुंबई महापालिका शिवसेनेकडेच राहणार; संजय राऊतांचा मनसेला टोला
2 शरद पवार हे तर महाविकास आघाडीचे आधारस्तंभ; मुख्यमंत्र्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
3 पवार कधी शिवसेनेला तंगडं वर करायला सांगतील आणि…; भाजप नेत्याचा टोला
Just Now!
X