महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (शनिवारी) भाजप उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत. शुक्रवारी औरंगाबाद मुक्कामी आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही सभा घेतल्या. पालकमंत्री रामदास कदम यांनी ठिय्या मांडला आहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यांनी प्रचारातून अंग काढते घेतले असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या नेत्यांची एकही सभा अजून झाली नाही. ते प्रचारास येणार की नाही, हेदेखील सांगितले जात नाही.
शहरात सर्वत्र रिक्षांना लावलेले भोंगे उमेदवारांच्या छायाचित्रांसह निवडणूक निशाणीचे फलक, नेत्यांच्या प्रचारफेऱ्या सुरू आहेत. राष्ट्रवादीत मात्र या सगळय़ा घटना-घडामोडींचे सोयरसुतकच नसल्यासारखे वातावरण आहे. उमेदवारीवरून युवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. ज्या उमेदवारांना तिकिटे देण्याची गरज होती, त्यांना नाकारल्याने ते या प्रक्रियेपासून दूर आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार बैठक घेऊन ही निवडणूक गांभीर्याने लढवू, असे सांगितले होते. तथापि, जाहीरनामाही आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित झाला. एकाही बडय़ा नेत्याची सभा अजून झाली नाही. सुप्रिया सुळे, अजित पवार हे दोघे निवडणूक प्रचारास येतील, असे सांगितले जात होते. मात्र, त्यांनी पाठ फिरविली. राजेश टोपे यांनी काही बैठका घेतल्या. मात्र, प्रचाराला योग्य ती दिशा देण्यात स्थानिक नेत्यांना अपयश आल्याची टीका राष्ट्रवादीतील एका नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर केली.
महापालिका निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीतील नेत्यांनी अन्य पक्षांत धाव घेतली. मुस्लिम नगरसेवकांनी एमआयएमला जवळ केले, तर काहींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी अनेकांना गळ घालावी लागली. काही तरुणांना मात्र जाणीवपूर्वक डावलण्यात आले. या पाश्र्वभूमीवर कोणी बडा नेता आला तर प्रचार मार्गी लागला असता, पण तसे घडले नाही.