छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर असोत. राज्य गहाण ठेवून त्यांचा पुतळा उभारणं हे म्हणजे त्यांच्या विचारांचा अपमान आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हे मत मांडलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावे लागले तरी माझी तयारी असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले होते. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर असोत. राज्य गहाण ठेवून त्यांचा पुतळा उभारणं हे म्हणजे त्यांच्या विचारांचा अपमान आहे. एकाने रयतेसाठी तर दुसऱ्याने समतेसाठी जीवन दिलं. या दोघांनाही राज्य गहाण ठेवून त्यांच्या पुतळा उभारणं हे कदापिही पटले नसते’.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हे राज्य पुरोगामी विचारांवर पुढे चालले आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावे लागले तर त्यासाठी माझी तयारी असेल’, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ठाण्यातील रिपाइं (आठवले गटा)च्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या नेत्यांचे पुतळे काँग्रेसने देशभर उभारले तर काही नेत्यांनी त्यांच्या वडीलांचेही पुतळे उभारले. परंतु, ज्या नेत्याने देशाची राज्यघटना लिहिली, त्या नेत्याचा मात्र त्यांना विसर पडला’’, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘गीता, बायबल, कुराणपेक्षा राज्यघटना आम्हाला प्रिय आहे. या राज्यघटनेमुळे आमचे अस्तित्व आहे आणि वंचितांना न्याय मिळतो आहे. देशाची राजकीय व्यवस्था आणि ओळखही या राज्यघटनेमुळेच आहे. बाबासाहेबांचे स्मारक मतांसाठी नव्हे तर मानवंदनेसाठी उभारण्यात येत आहे’’, असे त्यांनी सांगितले.