News Flash

‘पुरोहितांना सरकार महिना ५ हजार रुपये देणार मग शेतकऱ्यांना ५० हजार का देत नाही ?’

शेतकऱ्यांनी चारा व छावण्या मागितल्या आणि यांनी डान्सबार आणि लावण्या दिल्या ... गायीला वाचवा आणि बाईला नाचवा असे हे भाजपा सरकार आहे.

संग्रहित छायाचित्र

पुरोहितांना भाजपा सरकार महिना ५ हजार रुपये देणार आहे. एका घरात ४ लोक असतील तर २० हजार रुपये झाले. मग काळ्या आईची दिवसरात्र सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार ५० हजार रुपये महिना का देत नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. ‘योगी नरेंद्रचा एकच नारा..ना घर बसा हमारा ना बसने देंगे तुम्हारा’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा हिंगोलीत पोहोचली असून गुरुवारी वसमतनगर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत छगन भुजबळ यांनी भाजपाचा समाचार घेतला. भाजपा सरकारच्या काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, व्यापारी, उद्योजक आत्महत्या करत आहेत. या सरकारच्या काळात हे काय सुरु आहे, असा सवालही आमदार छगन भुजबळ यांनी केला.

ब्राह्मण आरक्षणाच्या मागणीसाठी नुकतेच आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात धार्मिक विधी करणाऱ्या ब्राह्मणांना दरमहा आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. याचा दाखला देत भुजबळांनी भाजपावर निशाणा साधला.

शेतकऱ्यांनी चारा व छावण्या मागितल्या आणि यांनी डान्सबार आणि लावण्या दिल्या … गायीला वाचवा आणि बाईला नाचवा असे हे भाजपा सरकार आहे. या देशात बोलण्यावरही बंदी टाकण्याचे प्रयत्न केले जात आहे. घटनेने मला बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे मी बोलणार…माझं बोलणं कुणीही थांबवू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

ज्याने खेळण्यातील विमान कधी बनवलं नाही त्याला राफेल विमान बनवण्याचा काम देण्यात आले, असे सांगत त्यांनी राफेल करारावरुन सरकारवर टीका केली. सध्या चुनावी जुमला चालू आहे. ओबीसी मुलांची शिष्यवृत्ती भरली गेली नाहीच. शिवाय विकासाचा मुद्दा यांच्याकडे नाही त्यामुळे जाती -जातीमध्ये भांडणे लावण्याचे कामे होतील. सर्वांनी यापासून सावध रहावे, असे त्यांनी म्हटले आहे.

या लोकांना मंदिर नाही तर सरकार बनवायचं आहे. या देशात किती मुर्ख आहेत हे दाखवायचं आहे. परंतु वाईट याच गोष्टीचे वाटते यामध्ये सुशिक्षित लोक आंधळे बनत चालले आहेत, असेही त्यांनी सांगितले. शरद पवार ममता बॅनर्जी, राहुल गांधी मिळून एकत्र येत आहेत, त्यावर टिका केली जाते. पण तुमच्यासोबत ४५ पक्ष आहेत तुम्ही सांगता मोदी एकटे आहेत मग हे सोबत कोण आहेत असा सवाल त्यांनी विचारला.
सामाजिक परिवर्तनाची क्रांती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणली. म्हणून म्हणतो दोनच राजे इथे गाजले… महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर एक तो रायगडावर… एक तो चवदार तळ्यावर असे म्हणत छगन भुजबळ यांनी या दोन महापुरुषांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 3:15 pm

Web Title: ncp nirdhar parivartan yatra basmatnagar chhagan bhujbal hits out bjp over brahmin reservation
Next Stories
1 शिवसेना मुंडावळ्या बांधून वाट बघत बसलेली नाही, संजय राऊत यांचा भाजपाला टोला
2 सत्ता आल्यास गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची सखोल चौकशी करणार: जयंत पाटील
3 औरंगाबाद : सागर मुगलेकडे राजपथवरील एनसीसीच्या पथकाचे नेतृत्व
Just Now!
X