शरद पवार यांचा उल्लेख शकुनी मामा असा करणाऱ्या भाजपा खासदार पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पलटवार केला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी पूनम महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी आजवर महिलांबाबत बेताल विधाने केली, तेव्हा पूनम महाजन डोळ्यावर पट्टी बांधून होत्या, आता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहिले ते तुम्हीच सांगा अशा शब्दांत रोहित पवार यांनी पूनम महाजन यांना प्रश्न विचारला आहे. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत पूनम महाजन यांना ३ प्रश्न विचारले आहेत. सोशल मीडियासह सर्वच स्तरातून रोहित पवारांच्या प्रत्युत्तराची सध्या चर्चा सुरु आहे.

पूनम महाजनांना रोहित पवार यांनी काय प्रत्युत्तर दिले?

गिरीष महाजन म्हणाले होते,
“दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नावे द्या मग खप कसा वाढतो ते बघा.”

गिरीष बापट म्हणाले होते,
“तुमच्या मोबाईलमध्ये काय असतं ते माहित आहे, तुम्ही मला म्हातारे समजू नका, या पिकल्या पानाचा देठ अजून हिरवा आहे.”

राम कदम म्हणाले होते,
“पोरी पटत नसतील तर पळवून आणा मी तुमच्या पाठीशी आहे…
आत्ता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे हि विधाने करण्यात आली तेव्हा पूनम महाजन डोळ्यांवर पट्टी बांधून होत्या. आत्ता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहीलं ते आपणच सांगू शकता.

भाजपाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष पूनम महाजन यांनी चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर आयोजित केलल्या युवा महासंगम जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यावर टीका केली होती. पूनम महाजन यांनी विरोधकांच्या महागठबंधनला महाठगबंधन असे संबोधून शरद पवार यांना शकुनी मामा म्हणून त्यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसही पूनम महाजन यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पूनम महाजन यांच्यावर टीका केली आहे. ‘पूनमताई महाजन… स्व. प्रमोद महाजन आणि शरद पवार यांचे मैत्रीचे संबंध आपण कसे काय विसरलात ? राजकारणातील प्रसिद्धीसाठी आपण शरद पवारांबद्दल जे काही बोललात, त्याचे आम्हीही सभ्यता ओलांडून उत्तर देऊ शकतो. आपल्या वडिलांवर प्रविण महाजन यांनी का गोळ्या झाडल्या हे कदाचित जगाला माहित नसेल. पण, यामागील अंतर्गत राजकारण माहिती असलेला मी एक आहे. तेव्हा आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार… सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.