औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एकमत नसून परस्परविरोधी वक्तव्यं केली जात आहेत. काँग्रेस नामांतराला विरोध करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र आपण वर्षानुवर्ष ही मागणी करत असल्याचं सांगत भूमिकेवर ठाम असल्याचं दाखवलं आहे. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना निश्चित पटवून देऊ असं म्हटलं होतं. दरम्यान नामांतराच्या विषयावरुन सुरु असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

संभाजीनगर उल्लेख योग्य म्हणत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला ठणकावलं; म्हणाले…

शरद पवार यांनी सांगितलं की, “आमच्यात वाद नाहीत. संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा, नाहीतर अजून काही म्हणा..या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही. त्यामुळे मी कधीही भाष्य केलं नाही”.

“नेमकं काय म्हणायचं आहे…,” उद्धव ठाकरेंनी नामांतराचं समर्थन केल्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री कार्यालायच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख करण्यात आल्यानंतर हा वाद नव्याने निर्माण झाला होता. त्यातच आता उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे-
सीएमओ ट्विटर हॅण्डलला संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, “त्याच्यात नवीन काय केलं मी…जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे तेच केलं आहे आणि तेच स्वीकारणार”. यावेळी त्यांना काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नाराजीबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, “औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही”.

बाळासाहेब थोरात यांनी काय प्रतिक्रिया दिली-
“औरंगाबाद नामांतराबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका कायम असून ती आम्ही मांडली आहे. पण मुख्यमंत्र्यांना नेमके काय म्हणायचे आहे…त्याबाबत आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना निश्चित पटवून देऊ. तसेच यामध्ये औरंगजेब हा विषय नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचेही आराध्यदैवत आणि श्रद्धास्थान आहे. पण प्रश्न असा आहे की, नामांतराच्या बाबतीत जे राजकारण होते, त्यामुळे माणसात भेद निर्माण होतात. ते होऊ नये यासाठी काँग्रेस विरोध करत असतं,” असं त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले होते की, “आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना व्यवस्थित पटवून देऊ. आम्ही एकत्र बसून चर्चा करु. आमची भूमिका कायम आहे. नामांतराला काँग्रेसने नेहमीच विरोध केला आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम केला असून त्याप्रमाणे काम करत आहोत. कुठे मतभेद झाले तर चर्चा करु”.