राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. राहुल गांधी यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शरद पवार यांचं नाव पुढे असल्याचं सांगितलं जात आहे. लवकरच शरद पवार सूत्रं हाती घेणार असल्याची चर्चा गुरुवारी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. राष्ट्रवादीने हे वृत्त मात्र फेटाळलं आहे. दरम्यान शरद पवार यांनी यावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शऱद पवार यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. “ही बातमी तुम्ही दिली आहे, अशा खोट्या बातम्या देऊ नका,” असं शरद पवार यांनी प्रसारमाध्यांना उद्देशून म्हटलं आहे. दरम्यान शरद पवार यांनी यावेळी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. “दानवेंच्या बोलण्याचा काय महत्व द्यायचं. काही लोकांना कुठे काय बोलायचं याचं तारतम्य नाही अशी टीका त्यांनी केली. याआधीही त्यांनी असं वक्तव्य केलं आहे,” असं शरद पवार म्हणाले आहेत.

“शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर…,” संजय राऊतांचं मोठं विधान
शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

शरद पवार यांनी यावेळी शेतकरी आंदोलन येत्या काही दिवसांत अजून चिघळण्याची शक्यता व्यक्त केली असून केंद्र सरकारने सहनशीलतेचा अंत पाहू नये असं आवाहन केलं आहे.

काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट
दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरु असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा राहुल गांधींविरोधातील मोहिमेचा भाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

“पवारांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा राहुल गांधींविरोधातील मोहिम; काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट”

संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधींविरोधात एक मोहिम सुरु असून शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे. याच मोहिमेअंतर्गत २३ स्वाक्षऱ्या असणारी चिठ्टी लिहिण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात सुसंगततेची कमतरता शोधण्यात आली. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे”.

संजय राऊतांची प्रतिक्रिया –
“शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनीही हे वृत्त नाकारलं आहे. शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. ही गोष्ट जर शरद पवारांनी स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणं योग्य नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “आम्ही तर नेहमीच हितचिंतक राहिलो आहोत. जर असा कोणता प्रस्ताव आला तर त्याचं समर्थन करु,” असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.