शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९४ वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु होते. शेतकरी कामगार पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहीली आहे. दरम्यान, गणपतराव यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल”

“लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे”, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या.

राजकीय कारकीर्द

गणपतराव देशमुख यांचा जन्म १९२७ सालचा. मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर असलेलं पेन्नूर हे त्यांचं गाव. मॅट्रिकचे शिक्षण पुण्यात घेतल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी पुण्यात पुढील शिक्षण पूर्ण केलं. याच काळात त्यांचा स्वातंत्र्य चळवळीकडे कल वाढला. काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे शंकरराव मोरे, नाना पाटील यासारख्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि ते या विचारधारेकडे झुकले.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधु अप्पासाहेब पवार आणि गणपतराव देशमुख रूममेट होत. तर स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल टाकत १९६२ची विधानसभा निवडणूक लढवली आणि ते सांगोल्याचे आमदार झाले. त्यांची ही वाटचाल दोन निवडणुका सोडल्या तर सुरूच आहे. आमदार होऊन पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या गणपतरावांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर केलेल्या भाषणाबद्दल यशवंतराव चव्हाण यांनीही त्यांचं कौतूक केलं होतं.

गणपतराव देशमुखांनी महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणुक लढवली आणि जिंकलेही. त्यानंतर दोन निवडणूका सोडल्या तर तब्बल ११ वेळा ते आमदार झाले. म्हणजे ५० वर्षांहून अधिक काळ ते विधानसभेचे सदस्य राहिले. या काळात त्यांनी दोन वेळा मंत्री म्हणून काम केलं. विशेष म्हणजे लोकांच्या हिताची कामं करण्यासाठी त्यांनी सातत्यानं पुढाकार घेतला.

तब्बल ११ वेळा झाले होते आमदार 

एकाच पक्षात राहून ११ वेळा आमदार झालेल्या गणपतराव देशमुख यांनी आमदारकी कधीही डोक्यात जाऊ दिली नाही. सहकाराबरोबर तालुक्याच्या पाण्यासाठी आणि इतर विकास कामांसाठी ते हिरारीने पुढाकार घेतला. विरोधी पक्षात राहूनही कामं करता येऊ शकतात हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिले. मंत्रीपदं गेल्यानंतर लागलीच शासकीय गाड्यांचा त्याग करणाऱ्या गणपतरावांनी आयुष्यभर एसटीनेच प्रवास केला. आमदारकीचा कुठलाही रूबाब न दाखवता लोकसेवेचं काम त्यांनी केलं. वयाच्या ९४ व्या वर्षी गणपतरावांनी निवडणूक (२०१९ ची विधानसभा निवडणूक) न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी लोक उमेदवारी अर्ज भरेपर्यंत लोक त्यांच्याकडे निवडणूक लढवावी असा हट्ट धरून बसले होते. इतकं प्रेम जनतेनं त्यांच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून केलं. आमदारकीसाठी पक्ष सोडणाऱ्या आजच्या राजकीय काळात गणपतराव देशमुखांनी एका पक्षात राहुन निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. अगदी मोदी लाटेतही आबासाहेबांना लोकांनी आमदार केलं. पण आमदारकी त्यांनी कधी डोक्यात जाऊ दिली नाही. त्यांनी मातीशी नाळ कायम ठेवली. त्यामुळेच एका पक्षात राहून ते तब्बल ५५ वर्ष ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar pays homage to ganapatrao deshmukh srk
First published on: 30-07-2021 at 23:52 IST