News Flash

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार येईल असं वाटलं होतं का?; सुप्रिया सुळे म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही एकाच घरातील दोन मुलं, सुप्रिया सुळेंनी मांडली महाविकास आघाडीची भूमिका

संग्रहित

राज्यात महाविकास आघाडीचं ससकार स्थापन झाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. यावेळी भाजपाने हे तीन चाकांचं सरकार टिकणार नाही असा दावाही केला होता. दुसरीकडे महाविकास आघाडीचं सरकार पुढील पाच वर्ष टिकणार असा दावा नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जी संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणात होती ती टिकवून ठेण्यासाठी महाविकास आघाडी सरकार होऊ शकलं असं मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत त्या बोलत होत्या.

“मी सत्तेचा आणि सरकारचा विचार करत नाही. कारण मला वाटतं लोकप्रतिनिधी काम करताना आपला मतदारसंघ पहिली जबाबदारी असतो. दिल्लीत निवडून जाताना राज्याप्रती असणाऱ्या जाबाबदारी पाडण्याची जबाबदारी असते. त्यातून सत्ता असू दे किंवा नसू दे त्याचा आपल्या कामाचं मूल्यांकन होता कामा नये. सत्तेत असलो तर ही पाच कामं करणार आणि ही करणार नाही असं मला पटत नाही,” असं स्पष्ट मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं आहे.

“बाळासाहेबांनी आणि पवार साहेबांनी मिळून एक मॅगजिन काढलं होतं. जर ते दोघं जर तसा प्रयोग करु शकत असतील तर महाविकास आघाडीचं सरकार का होऊ शकत नाही?,” असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही एकाच घरातील दोन मुलं असल्याने त्यांनी एकत्र येऊन काम करणं अवघड नाही. मला विचाराल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील सर्वात जवळचं नातं मी पाहिलं ते म्हणजे मनमोहन सिंग आणि शरद पवार यांचं. १० वर्षात त्यांच्या नात्यात कधी पक्ष आलाच नाही. मी लांबून हे सगळं पाहिलं आहे. तिथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हा विषय कधीच नव्हता. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असल्याची जाणीव कधी कोणाला करुन दिलं नाही. त्यांनी सर्वांना मान देऊन निर्णयप्रक्रियेत सहभागी करुन घेतलं,” असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.

“१५ वर्ष महाराष्ट्रात आम्ही एकत्र काम केलं त्यामुळे कार काही वाटलं नाही. समान किमान कार्यक्रम असेल तर कोणासोबत काम करणं अवघड नसतं,” असंही त्यांनी सांगितलं.

“समाजवादी आमच्या घऱात येऊन वाद घालायचे. भांडण सुरु आहे असं वाटायचं. आमच्या घरी जेवल्यानंतर शरद पवारांच्यात धोरणावर टीका करुन चर्चा करुन ते जायचे. ही संस्कृती जी महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणात होती ती टिकवून ठेण्यासाठी महाविकास आघाडी सरकार होऊ शकलं. आमच्या कोणत्याही नात्यात कटूता नाही. ती येऊ नये यासाठी प्रयत्न असतो,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

भाजपाला एकटं पाडावं असा हेतू होता का असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “कोणाला तरी एकटं पाडावं असं काही नव्हतं. त्यांनी नापास व्हावं म्हणून मी पास झालं पाहिजे असं वाटत नाही. आपलं स्तव;चं एक अस्तित्व असलं पाहिजे. एक विचार ज्याच्याशी ठाम असलं पाहिजे. एखाद्याला खाली दाखवायचं म्हणून काही तरी करायचं हे मॉडेल टिकणार नाही,” असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. “महाविकास आघाडी सरकारला देशात बरं म्हणतात. आधी सर्वांना हे टिकणार नाही असं वाटत होतं,” असंही त्या म्हणाल्या.

“आपण सगळ्यांनी गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. टीव्हीवरची भांडणं पाहिली तर भीती वाटते. राजकारणात असल्याने काय ट्रेंड सुरु आहे हे पहायला लागतं. ज्या गांभीर्याने आपण सरकाचं काम विरोधकांचं काम घेतलं पाहिजे याच्यात काहीतरी कमी जाणवतं,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

भाजपाचा अश्वमेध रोखला किंवा महाविकास आघाडीने पर्याय दिला असं दाखवण्याचा विचार होता का असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “समविचारी आणि देशाच्या स्थैर्यासाठी हे महत्वाचं होतं. देशाचा अभ्यास केला तर मध्य प्रदेशपासून खाली कुठेही भाजपा नाही. मध्य प्रदेशातही तोडून फोडून प्रयत्न केला. उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सोडलं तर कुठेही नाहीत, सगळा देश पाहिल्यानंतर दोन राज्यं सोडली तर इतर कुठे फार प्रभाव नाही. आसाममध्ये मुख्यमंत्री झाले तरी ते काँग्रेस डीएनएचे झाले. आपणच सगळ्यांनीच बागलबुवा करुन ठेवला आहे. लहानपणी एक बागलबुवा येणार आहे हे किती मोठं करुन ठेवलं होतं की वास्तवापासून दूर होतं. त्यासाठी आपणही दोषी आहोत”.

“नक्की भाजपा खरी कोणती आहे. त्यांच्या पक्षात इतर बरेच ओळखीचे चेहरे दिसतात. मग या बाजूमध्ये आणि तिथे अंतर काय राहिलं. पार्टीत कोणताही डिफरन्स नाही,” असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.

भाजपात गेलेले पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करतायत का? असं विचारलं असता त्यांनी म्हटलं की, “प्रत्येक व्यक्ती, लोकप्रतिनिधी त्याचा एक मान सन्मान असला पाहिजे. पक्षांतरात मला पडायचं नाही. महाराष्ट्राचं राजकारण इतकंही हलकं करु नये”. “राजकारण त्याच्या पुढे गेलं पाहिजे. आज आपण उजवे डावे यातच अडकलो आहोत. गांभीर्य कमी झालं आहे. आपण धोरणांवर कधी वाद घालणार, अर्थव्यवस्था. रोजगार यावर चर्चा कधी होणार. संसद अधिवेशनात यावर चांगलीच चर्चा झाली पाहिजे. आपण या गोष्टी दुसरीकडे वळवत आहोत का? राजकारण फार हलक्या पद्दतीने घेतलं जात आहे. महाबळेश्वर की लोणावळ्याला सुट्टीला जाऊ इतकं सोपं नाही. सरकारने घेतलेल्या निर्णयांचे दूरगामी परिणाम असतात. गांभीर्य आपण घालवून बसलो आहे का असं मला वाटतं,” अशी खंत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 5:40 pm

Web Title: ncp supriya sule loksatta drushti ani kon progamme mahavikas aghadi shivsena ncp congress sgy 87
Next Stories
1 करोनाच्या उद्रेकापासून महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘या’ गावात करोनाचा शिरकाव
2 तू राजकारणाच्या फंद्यात पडू नकोस असं कधी आई-वडिलांनी सांगितलं का?; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
3 VIDEO: सुप्रिया सुळे यांचा ‘दृष्टी’ आणि ‘कोन’; पहा YouTube वर
Just Now!
X