राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी आईसोबतच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाविषयी त्यांनी ट्विट देखील केलं. शरद पवार यांनी केलेल्या ट्विटवर एका नेटकऱ्यानं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ शेअर करून त्यांचा जीव वाचवण्याची विनंती केली आहे.

रविवारी महिला दिनानिमित्त प्रथम या शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेनं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी पवार यांनी शैक्षणिक क्षेत्राविषयी भाष्य केलं. “प्रथम शिक्षण संस्थाही समाजातील दुर्लक्षित मुलांसाठी हिरीरीने काम करत आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहचवण्याचा संस्थेचा मानस आहे. हे काम त्यांनी असेच अखंडपणे करत राहावे, संस्थेला या कामात आम्ही नेहमीच साथ देऊ हा विश्वास व्यक्त करतो आणि संस्थेला शुभेच्छा देतो,” असं पवार म्हणाले.

या कार्यक्रमाचं ट्विट शरद पवार यांनी केलं. त्यावर धोंडू बंडू गोरे यांनी जंगलातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडीओ शेअर केला. तसेच त्यांची मदत करण्याची विनंती शरद पवार यांना केली. “शरदचंद्रजी पवार साहेब, मला मदत करा. या विद्यार्थ्यांच्या जिवासाठी ही आपणास नम्र विनंती आहे. पवार साहेब मदत करा. मदत करा. मदत करा. या विद्यार्थ्यांचे जीव जंगली प्राण्यांपासून वाचवा. जंगली प्राणी यांचे जीव घेत आहे,” असं कळकळीची विनंती गोरे यांनी केली आहे.

…अन् आई एसटीमधून डबा पाठवायची -पवार

या कार्यक्रमात शरद पवार यांनी शालेय आयुष्यातील आईविषयीच्या आठवणींचं स्मरणं केलं. “आम्ही सातही भावंडं शिकलो. आई आमच्यासाठी एसटीमधून डबा पाठवायची. तसेच आम्ही नीट शिकतो आहोत ना हे पाहण्यासाठी स्वतः जातीने यायची. हे शिक्षणाचे संस्कार पहिल्यापासूनच आमच्यावर झाले. त्यामुळे आम्ही कुठल्याही क्षेत्रात काम केलं तरी शिक्षणक्षेत्रासाठी काम केलं पाहिजे, हे सदैव मनात असतं. माझं स्वतःचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. आधी घरात कोणी विशेष शिकलेलं नव्हतं. पण, माझ्या आईला शिक्षणाबाबत खूप आस्था होती. त्यामुळे नंतरच्या पिढ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळालं,” अशी आठवण यांनी सांगितली.