नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यात येणार आहे. त्यानुसार, शाळा-महाविद्याालयांनी विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणावर भर द्यावा. प्राथमिक व उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची गळती कमी करणे हा देखील या शिक्षण धोरणाचा उद्देश आहे. व्यावसायिक शिक्षणावर भर देणारे हे धोरण आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शिक्षक आघाडीच्यावतीने ‘कोविड १९ : शैक्षणिक धोरण, आव्हाने आणि संधी’ या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, तर प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, खासदार प्रतापराव जाधव आदी उपस्थित होते.

वर्तमान शैक्षणिक परिस्थितीत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वाास वाढविणे ही शैक्षणिक क्षेत्रापुढील सर्वात मोठी प्राथमिकता असून अशा परिस्थितीशी जुळवून घेणारे तंत्रज्ञान शिक्षक व विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याची गरज उदय सामंत यांनी व्यक्त केली. करोना काळात शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनोबल कमी होऊ न देण्याचे मोठे आव्हान आहे. विद्यार्थ्यांमध्ये वास्तविक दृष्टिकोन रुजवण्याचे शिक्षण व्हावे, असे अ‍ॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या.

हर्षवर्धन देशमुख यांनी नवे शैक्षणिक धोरण अंमलात आणण्यामागील केंद्राचा उद्देश तपासून पाहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून वर्तमान शैक्षणिक परिस्थितीवर प्रकाश टाकला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणाची गरज प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.
परिषदेच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे यांनी शाळा व शिक्षकांच्या प्रकारात असलेली विषमता नष्ट करून सर्वांना एका समान पातळीवर आणल्याशिवय नवे शैक्षणिक धोरण यशस्वी होऊ शकत नसल्याचे सांगितले. शिक्षकांच्या सेवा, शर्थी व सुरक्षितता मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने पाऊले उचलावे. विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न शासनाने त्वरित निकाली काढावा, अशी मागणी करून त्यांनी परिषदेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली.

समारोपीय कार्यक्रमात वसंत घुईखेडकर यांच्या अध्यक्षतेत प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणतज्ज्ञ हेमंत काळमेघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या परिषदेत विविध तज्ज्ञांनी संबोधित केले. सूत्रसंचालन डॉ. आशिष राऊत, तर आभार डॉ. पौर्णिमा दिवसे यांनी मानले.