महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राहुल ब्रिगेडने वेगळी रणनीती आखली आहे. जिल्हय़ाजिल्हय़ातील नेत्यांनी रेटलेली नव्हेतर तालुका पातळीवरील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी सुचवलेली नावे विचारात घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचे केंद्रीय निरीक्षकांच्या नांदेड दौऱ्यातून स्पष्ट झाले.
अ. भा. काँग्रेस कार्यकारिणीचे पदाधिकारी व महाराष्ट्रासंबंधीची जबाबदारी पार पाडणारे मधुसूदन मेस्त्री यांनी निरीक्षक म्हणून पाठविलेले पी. चेंगल रायडू यांनी दोन दिवसांच्या नांदेड दौऱ्यात जिल्हय़ातील नऊ मतदारसंघांतील परिस्थिती जाणून घेतली. जागा वाटप प्रक्रियेत ‘राष्ट्रवादी’ने अडवणूक केलीच तर स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीचा एक भाग म्हणून रायडू यांनी किनवट, लोहा व नायगाव विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांची नावे सोबत नेली. या मतदारसंघात २००९ मध्ये राष्ट्रवादीने निवडणूक लढविली होती. आपली जबाबदारी ‘पोस्ट मास्तर’ची आहे. मतदारसंघनिहाय जी नावे आपल्याकडे आली ती आपण केंद्रीय नेत्यांकडे सादर करणार आहोत. नंतर ही सर्व नावे खासदार राहुल गांधी यांच्याकडे जातील, असे रायडू यांनी रविवारी सकाळच्या सत्रात स्पष्ट केले.
शनिवारी पहिल्या दिवशी भोकर मतदारसंघासाठी अमिता अशोक चव्हाण यांच्या नावाची एकमताने शिफारस झाली. चव्हाण यांच्याशिवाय अन्य नाव सुचविले जाऊ नये, अशी व्यवस्था करून पक्षातील काहींनी माजी खासदार भास्करराव खतगावकर यांना परस्पर शह दिला. मुखेडमध्ये विद्यमान आमदार हणमंतराव बेटमोगरेकर यांचेच नाव एका चमूने रेटले. तथापि, या प्रक्रियेपासून अविनाश घाटे, व्यंकटराव गोजेगावकर, बळवंतराव बेटमोगरेकर प्रभृती दूर राहिले. आमदारांच्या निकटवर्तीयांकडून गोजेगावकरांचा नेहमी एकेरी उल्लेख केला जातो, ही बाब त्यांना खटकली आहे, असे कळते.
दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळच्या सत्रात निरीक्षकांनी आधी उपस्थित पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि अन्य संबंधितांना मार्गदर्शन केले. एका मतदारसंघात तुम्ही चार नावे सुचवू शकता, असे त्यांनी स्पष्ट केले. नंतरच्या सत्रात मतदारसंघनिहाय आढाव्याचे तसेच इच्छुकांची नावे जाणून घेण्याचे कामकाज रायडू यांनी सुरू केले. अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार अमर राजूरकर सकाळी मुंबईहून येथे दाखल झाले. त्यांनी रायडू यांची स्वतंत्रपणे भेट घेतली, पण त्या चर्चेचा तपशील कळाला नाही. खासदार चव्हाण येथे येऊ शकले नाहीत. तर माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली. बैठकस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवर स्थानिक नेत्यांतून फक्त चव्हाण यांचाच फोटो टाकण्यात आला.
शनिवारच्या सत्रात नांदेड (उत्तर) मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी पालकमंत्री डी. पी. सावंत यांचे नाव आमदार अमर राजूरकर यांनी सुचविल्यानंतर इतर प्रतिनिधींनी त्यांचीच ‘री’ ओढली. तालुकाध्यक्षांसह इतर प्रतिनिधींनी सावंत यांचे एकटय़ाचे नाव सुचविलेच, पण जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांचे नगरसेवक पुत्र डॉ. विश्वास यांनीही अन्य पर्याय नाहीच, असे नमूद करून डी. पी. सावंत यांचे नाव उचलून धरले, हे विशेष!
नांदेड (द.) मतदारसंघात एक गट आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचे नाव पुढे करत असताना, ग्रामीण भागातून माधवराव झरीकर यांच्या उमेदवारीची शिफारस झाली. सकाळच्या सत्रात पक्षाचे शहराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते गैरहजर होते. ते स्वत: नांदेड (द.) मधून इच्छुक असून त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाची शिफारस केली.
सकाळच्या सत्रात प्रदेश काँग्रेसकडून आलेले समन्वयक विलास औताडे, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, माजी महापौर मंगला निमकर, हिंगोले, संजय कुलकर्णी, माधव पांडागळे, संतोष पांडागळे आदी हजर होते.