30 May 2020

News Flash

नव्या महापौराची आज निवड

महापौरपदाची प्रतीक्षा आता काही तासांवर आली आहे. नवा महापौर निवडण्यासाठी उद्या महानगरपालिकेची सभा होणार आहे. शिवसेनेत याबाबत गोंधळाचे वातावरण असले तरी, काँग्रेसनेही राष्ट्रवादीसमोरील अडचणी वाढवल्या

| June 8, 2015 04:00 am

महापौरपदाची प्रतीक्षा आता काही तासांवर आली आहे. नवा महापौर निवडण्यासाठी उद्या महानगरपालिकेची सभा होणार आहे. शिवसेनेत याबाबत गोंधळाचे वातावरण असले तरी, काँग्रेसनेही राष्ट्रवादीसमोरील अडचणी वाढवल्या आहेत. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या नगरसेवकांना पक्षादेश बजावला असून या निवडीबाबत शहरात कमालीची उत्सुकता व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात महापौर निवडीसाठी उद्या (सोमवार) सकाळी मनपाची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या निवडीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अनिल कवडे काम पाहणार आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर व शिवसेनेचे सचिन जाधव यांच्यात या पदासाठी सरळ लढत होत आहे. सकाळी ११ वाजता सभा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात येईल. त्यानंतर निवडीची प्रत्यक्ष प्रक्रिया होणार आहे.
राष्ट्रवादीने आपल्याला ३८ नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे तर, शिवसेनेची अजूनही जुळवाजुळव सुरू असून त्यांचा चमत्कारावर भरवसा आहे. दोन्ही बाजूचे बहुसंख्य नगरसेवक गेले काही दिवस सहलीची मौज लुटत असून या नगरसेवकांना रविवारी रात्रीपर्यंत शहरापासून जवळ आणून ठेवण्यात येईल. उद्या (सोमवार) सकाळी निवडणुकीच्या वेळीच त्यांना खडय़ा पहा-यात सभास्थानी आणण्यात येईल.
काँग्रेसच्या व्हीपवर आक्षेप
दोन्ही काँग्रेसच्या निरीक्षकांशी झालेल्या चर्चेनंतर शुक्रवारी काँग्रेसचा अहवाल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठवण्यात आला आहे. तेच याबाबत निर्णय देतील, असे सांगण्यात येते. मात्र त्यांचा रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही निरोप आलेला नाही. मात्र त्याआधीच पक्षाचे मनपातील गटनेते संदीप कोतकर यांनी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक दीप चव्हाण वगळता अन्य नगरसेवकांना पक्षादेश बजावला आहे. यावर पक्षातच जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत असून हा प्रदेशाध्यक्षांचा अवमान असल्याची तक्रार करण्यात येत आहे. त्यांच्या अधिकारावर कोतकर यांनी गदा आणल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र पक्षाचे बहुसंख्य नगरसवेक राष्ट्रवादीबरोबरच आहेत.
मनसेला अजूनही पक्षादेश नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या बाजूने पक्षादेश बजावला आहे. मात्र तो अद्यापि मिळालाच नसल्याचे अजूनही सांगण्यात येते. आज या नगरसेवकांची बैठक होणार होती, मात्र तीही रद्द करण्यात आली. या नगरसेवकांनी पक्षाचा पक्षादेश झुगारल्यातच जमा आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2015 4:00 am

Web Title: new mayor selection today
Next Stories
1 मान्सून महाराष्ट्रात, कोकणात संततधार
2 कच-याची वाहने नागरिकांनी रोखली
3 रक्तरंजित नक्षल प्रदेशात अनोखी समलैंगिक प्रेमकथा
Just Now!
X