ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकसभा निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरूआहे. औरंगाबाद येथे आम आदमी पक्षाशी फारकत घेणाऱ्या काहींनी नव्याने औरंगाबाद परिवर्तन आघाडी स्थापनेची प्रक्रिया सुरू केली असून, या माध्यमातून बाळासाहेब सराटे अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी हजारे ४ एप्रिलला येथे सभा घेणार असल्याची माहिती प्रसिद्ध विधिज्ञ सतीश तळेकर यांनी गुरुवारी पत्रकार बठकीत दिली.
या पूर्वी हजारे यांनी उमेदवारीसाठी पािठबा दिल्याचा दावा तळेकर करीत होते. मात्र, आता निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत त्यांनी सराटे हे अण्णा पुरस्कृत उमेदवार असतील, असे सांगितले. शहरात आयोजित एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळी उमेदवारांना पुरस्कृत करणार नसल्याचे हजारे यांनी सांगितले होते. जिल्ह्याचा विकास झाला नाही, असा आरोप करीत लोकसभा निवडणुकीत उतरू,असे काही दिवसांपासून अॅड. तळेकर सांगत होते.
आम आदमी पक्षाचे दिल्लीत सरकार आल्यानंतर प्रशांत भूषण यांना अभिनंदनाचा संदेश पाठविला होता. तेव्हा आम आदमी पक्षात या, असे त्यांनी सुचविले होते. चर्चा झाली. पण नंतर अण्णांनी पक्षनिरपेक्ष भूमिका घेऊन समाजपरिवर्तनासाठी लढण्याचा संदेश दिला. प्राधान्यक्रमाचा विचार करता लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत तळेकर यांनी सराटे चांगले उमेदवार आहेत. त्यांना अण्णांचा पािठबा आहे, असा दावा केला. आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष लोमटे प्रामाणिक माणूस आहे, पण जिंकण्यासाठी आवश्यक क्षमता त्यांच्याकडे नाही, असेही तळेकर म्हणाले. दि. ४ एप्रिलला कोठे सभा होईल, हे मात्र सराटे यांनी सांगितले नाही. अण्णांच्या समर्थनाचा दावा करताना आता नव्या नावाची चर्चा सुरू आहे. आम आदमी पक्षाचे काही कार्यकत्रे व रिक्षा युनियन तसेच आयुर्विम्याचे एजंट सहकार्य करणार असल्याची माहिती सराटे यांनी दिली.