21 January 2021

News Flash

पर्ससीन नेटद्वारे मासेमारीच्या नवीन हंगामाला आज प्रारंभ

जिल्ह्यात परवानाधारक पर्ससिननेट नौकांची संख्या सुमारे पावणेतीनशे इतकी आ

(संग्रहित छायाचित्र)

ट्रॉलिंग, गिलनेटपाठोपाठ  पर्ससिननेटद्वारे मासेमारीच्या नवीन हंगामाला आजपासून (१ सप्टेंबर) प्रारंभ होत असला तरी तो पूर्ण क्षमतेतेने सुरू होण्यासाठी आणखी सुमारे दोन आठवडे लागतील, असा अंदाज आहे.

करोनाच्या प्रादूर्भावामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा परिणाम खलाशांच्या आगमनावर होत असून खलाशांअभावी काही ठिकाणी नौका बंदरातच उभ्या ठेवाव्या लागणार आहेत.

डॉ. सोमवंशी समितीच्या शिफारशीनुसार मासेमारीबाबत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार पर्ससीन जाळ्याने मासेमारी करण्यासाठी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर हा कालावधी निश्चित करुन दिला आहे. मागील हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात करोनाचा प्रादूर्भाव झाल्याने काही काळ मासेमारी पूर्ण बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या व्यवसायाचे गणित कोलमडले होते.

यंदा सुरूवातीलाच खलाशांना आणण्यासाठी ईपास काढण्यापासून त्यांना क्वोरंटाईन करुन ठेवण्यापर्यंत सर्व गोष्टी मच्छीमारांना कराव्या लागत आहेत. काही नौकांनी ठाणे, पालघर येथून खलाशी आणून ठेवले आहेत. कर्नाटक, ओरीसा, बिहार या राज्यांमधून येणाऱ्यांसाठी खटपट सुरु आहे. या परिस्थितीत २५ ते ३० टक्केच पर्ससिननेट नौका आज समुद्रावर स्वार होतील अशी शक्यता आहे.

जिल्ह्यात परवानाधारक पर्ससिननेट नौकांची संख्या सुमारे पावणेतीनशे इतकी आहे. रत्नागिरी, राजापूर तालुक्यातच या नौका आहेत. करोनाच्या सावटाखाली ही मासेमारी सुरु होणार आहे. कर्नाटक बरोबरच नेपाळमधील अनेकजणं बोटींवर काम करण्यासाठी गेल्या काही वर्षांत कोकणात येत आहेत. एका पर्ससीन बोटीवर २५ ते ३० खलाशी काम करतात. जिल्ह्यात खलाशी म्हणून काम करण्यासाठी परजिल्हा किंवा परराज्यातून सुमारे ८ ते ९ हजार कामगार मासेमारी हंगामात येतात. पण यंदा करोनामुळे नेपाळमधून भारतात येण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अनेक नेपाळी येऊ  शकलेले नसल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्याऐवजी अन्य राज्यातील किंवा ठाणे, पालघर येथील लोकांचा पर्याय मच्छीमारांना अवलंबावा लागणार आहे. या बाबी लक्षात घेता यंदाचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आणखी सुमारे दोन आठवडे लागतील, असे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 12:16 am

Web Title: new season of fishing by persin net starts today abn 97
Next Stories
1 सिंधुदुर्गात ऑगस्ट महिन्यामध्ये ९१३ करोना रुग्ण
2 खासगी रुग्णालयांच्या दरनियंत्रणाला अखेर मुदतवाढ !
3 आरोग्य विभागाकडून कंत्राटी डॉक्टरांना पाच महिने करोना प्रोत्साहन भत्ता नाही !
Just Now!
X