लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर काँग्रेस आघाडीमध्ये आत्तापासूनच धुसफूस आणि सावध हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रामुख्याने अनेक विधानसभा मतदारसंघांत विविध राजकीय प्रश्न आत्तापासूनच उपस्थित होऊ लागले असून, त्याची सुरुवातच राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार राजीव राजळे यांच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघापासूनच सुरू झाली आहे.
मुळातच मोठय़ा गटबाजीने पोखरलेली काँग्रेस आघाडी लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेने पुरती हबकली आहे. या निकालाचे परिणाम विधानसभेवर होण्याची शक्यता आता काँग्रेस आघाडीतच व्यक्त होऊ लागली आहे. त्याला कसे तोंड देणार हा प्रश्न तर आहेच, त्यादृष्टीनेच विविध राजकीय प्रश्न आत्तापासूनच उपस्थित होऊ लागले आहेत. ते काँग्रेस आघाडीला आणखी अस्वस्थ करणारे आहेत. राजळे यांच्याच शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात राष्ट्रवादीला केवळ ११ हजारांची आघाडी मिळाली. अन्य सर्वच विधानसभे मतदारसंघात तर पक्षाची मोठीच पिछेहाट झाली. त्याची कारणमीमांसाही यथावकाश होईल. मात्र त्यानिमित्ताने उपस्थित होऊ लागलेले प्रश्न अधिक गंभीर आहे.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघापासूनच ही प्रश्नांची मालिका सुरू झाली आहे. येथे आता राजळे काय करणार हा पहिला प्रश्न. गेल्या वेळीही राजळे यांनी नगरमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. पराभवानंतर त्यांनी येथून विधानसभेतही अपक्ष म्हणून नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातही ते अपयशी ठरले. आत्ताचे हे त्यांचे सलग तिसरे अपयश. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा त्रास नको म्हणून आमदार चंद्रशेखर घुले व माजी आमदार नरेंद्र घुले या बंधूंनी लोकसभा निवडणुकीत राजळे यांच्या उमेदवारीसाठी जोरदार किल्ला लढवला. ते खासदार झाले तर विधानसभेला आपला त्रास कमी होईल हीच त्यामागची भूमिका होती. मात्र राजळे यांचा लोकसभेतच पराभव झाल्याने आता पुढे काय, हा प्रश्न आहेच. तो घुले बंधूंना सतावणारा आहे.
याच मतदारसंघात दुसरा प्रश्न निर्माण झाला आहे, तो प्रताप ढाकणे यांचा. लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासह त्यांनी पक्षाचाच त्याग केला. भाजपच्या उमेदवारीसाठी त्यांचा खासदार दिलीप गांधी यांना विरोध होता. या उमेदवारीत बदल होत नाही, हे पाहून अखेर त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रशेखर घुले असले तरी आता ढाकणे व राजळे हे दोघेही आता विधानसभा निवडणुकीत काय करणार, याचे उत्तर आज तरी अनेकांकडे नाही. राष्ट्रवादीत प्रवेश करताना ढाकणे यांना विधानपरिषदेचा शब्द देण्यात आला आहे, मात्र लोकसभेतच पक्षाचा मोठा पराभव झाल्याने हाही आता वेगळाच प्रश्न या मतदारसंघात आता उभा राहील असे दिसते.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात आता भाजपचा उमेदवार कोण, याकडे जिल्हय़ाचेच लक्ष आहे. गांधी यांना सर्वात मोठे मताधिक्य या मतदारसंघाने दिले. याआधीच्या निवडणुकांमध्ये गांधी यांना जेवढे एकूण मताधिक्य मिळाले नव्हते, त्यापेक्षा अधिक मते त्यांना या वेळी एकटय़ा श्रीगोंद्याने दिली. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच येथे अनेक जण विधानसभेसाठी भाजपच्या रांगेत उभे आहेत. त्यादृष्टीने किमान तिघांची नावे चर्चेत असून चर्चेत नसलेलेही काही प्रमुख नेते या प्रयत्नात आहेत.
केवळ राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच नव्हेतर भाजप-शिवसेनेतही काही प्रश्न आत्तापासूनच उपस्थित होऊ लागले आहेत. गांधी विक्रमी मतांनी विजय झाले असले तरी काही प्रश्न उपस्थित होत आहेत, हे विशेष! किंबहुना त्यामुळेच हे प्रश्न उपस्थित झाल्याचे दिसते. त्यात सर्वात मोठा प्रश्न आहे तो भाजप आता नगर शहर विधानसभा मतदारसंघात काय भूमिका घेणार हा आहे. लोकसभा निवडणुकीत गांधी यांना सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळाली, त्यात नगर शहरच सर्वात खाली आहे. अन्य चार मतदारसंघांत त्यांनी ४० हजारांच्याच पुढे मताधिक्य मिळवले. स्वत:च्या नगर शहरात मात्र त्यांना हा आकडा गाठता आला नाही. शिवसेनेचे आमदार अनिल राठोड आणि गांधी यांच्यातील दुरावा लक्षात घेता व त्याअनुषंगाने सुरू असलेल्या चर्चेत आता विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या हालचालींबाबत आत्तापासूनच उत्सुकता व्यक्त होते.