आरोंदा येथे जेटी बंदरासाठी संघर्ष होत आहे. त्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालय देईल, पण मच्छीमारांसाठी दोन जेटी पतन विभागाने बांधल्या आणि त्याचा फायदा मच्छीमारही घेत आहेत.
आरोंदा हॉटेल गेटसच्या पुढे असणाऱ्या वाडीवर दोन जेटींचे बांधकाम झाले असून मच्छीमार त्याचा फायदा घेत आहेत. या दोन जेटी पतन विभागाने बांधल्या आहेत, असे सांगण्यात आले.
आरोंदा येथे ब्रिटिश-पोर्तुगीजकालीन जेटी बंदर होते, ते विकसित करण्यास सरकारने खासगी कंपनीला दिले आहे. या कंपनीने जमीन खरेदी करून जेटी बंदर विकसित करण्यासाठी पावले टाकली. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात कामही झाले, पण तोवर कोणताही पर्यावरणवादी किंवा गावातील लोकांनी विरोध केला नव्हता.
या वेळी जेटी बंदरविरोधात लोकांनी आरोंदा बचाव संघर्ष समिती स्थापन करून विरोध केला. त्यानंतर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शासकीय यंत्रणेकडून न्याय मिळणार नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे आरोंदा बचाव संघर्ष समितीला बळ आले आहे.
आरोंदा मच्छीमारांसाठी दोन नवीन जेटींची उभारणी पतन विभागाने केली, पण त्याचा गाजावाजा झालेला नाही. या जेटी सध्या कार्यरत असून मच्छीमार फायदा घेत असल्याचे सांगण्यात आले.