News Flash

“नाईट कर्फ्यू, लॉकडाउन संसर्ग रोखण्यात फारसा परिणामकारक नाही”

केंद्रीय पथकांच्या पाहणीनंतर केंद्राचं महाराष्ट्राला पत्र

प्रातिनिधीक छायाचित्र

राज्यात करोना पुन्हा एकदा सोकावत असल्याचं दिसत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णवाढीचा वाढता आलेख कायम असून, दिवसेंदिवस तो आणखी वर सरकू लागला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं असून, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू आणि अंशतः लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याचसंदर्भात केंद्राने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवलं असून, नाईट कर्फ्यू आणि नव्याने लागू केलेला लॉकडाउन परिणामकारक नसल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात करोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर केंद्राने संबधित राज्यांमध्ये तज्ज्ञांची पथकं पाठवली होती. या पथकांनी राज्यातील करोना प्रसार नियंत्रित करण्याबरोबर काही उपाययोजनासंदर्भात सूचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारला अहवालही पाठलेला होता. या अहवालानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं असून, नाईट कर्फ्यू आणि लॉकडाउनसारख्या उपाययोजना प्रसार रोखण्यात फारशा परिणामकारक नसल्याचं म्हटलं आहे.

केंद्रीय पथकांनी विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर केंद्राने विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमित घरं शोधणे व कंटेमेंट झोनवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर संक्रमण रोखण्यासाठी जर एखादी व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्यास तिच्या संपर्कातील २० ते ३० जणांचा शोध घेण्याची गरज आहे, असं केंद्राने म्हटलं आहे. बस स्थानकं, झोपडपट्टी भाग, रेल्वे स्टेशन यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी राज्य सरकारने रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्सचा वापर करायला हवा. जे लोक करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत आणि घरातच विलगीकरणात आहेत, त्याचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, असं केंद्राने राज्य सरकारला म्हटलं आहे.

नव्याने लागू करण्यात आलेले निर्बंध कोणते?

१. राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार सर्व सिनेमागृहे, हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने कार्यरत राहतील. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.
२. शॉपिंग मॉल्समध्ये देखील मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. मॉल व्यवस्थापनाने मॉलमधील सिनेमागृह आणि रेस्टॉरंट नियम पाळत आहेत याची खात्री करावी.
३. कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणांसाठी एकत्र येण्यास मनाई असेल. तसे झाल्यास ज्या जागी असे कार्यक्रम होतील, त्या जागेच्या मालकावर कारवाई केली जाईल.
४. लग्नकार्यामध्ये ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. नियम मोडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
५. अंत्यविधींसाठी २० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नसेल.
६. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना देखील नियम पाळावे लागतील. त्यांची माहिती आणि संबंधित डॉक्टरांची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी लागेल.
७. होम आयसोलेशनमधील व्यक्तीच्या घराच्या दरवाजावर किंवा संबंधित जागेवर १४ दिवसांसाठी ही बाब स्पष्ट करणारा बोर्ड लावावा.
८. होम क्वारंटाईनचा स्टॅम्प संबंधित रुग्णाच्या हातावर मारण्यात येईल.
९. होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर व्यक्तींनी देखील गरज असेल तरच मास्क लावून घराबाहेर पडावे.
१०. आरोग्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व कार्यालये ५० टक्के कर्मचारी क्षमतेनंच सुरू राहतील. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
११. धार्मिक स्थळांनी संबंधित ठिकाणी येणे शक्य होणाऱ्या व्यक्तींची कमाल मर्यादा जाहीर करावी. या व्यक्तींना संबंधित ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून वावर करण्यासाठी पुरेशी जागा असायला हवी. तेवढ्याच व्यक्तींना प्रतितास प्रवेश दिला जावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 12:13 pm

Web Title: night curfews lockdown have little impact on containing covid transmission bmh 90
Next Stories
1 “महाराष्ट्र देशाच्या आर्थिक केंद्रस्थानी असल्याने…”; करोना लसीकरणासंदर्भात आनंद महिंद्रांची मोठी मागणी
2 मुंबई-पुण्याकडे खासगी बस वाहतूक बंद
3 ग्रामीण भागाकडे लक्ष
Just Now!
X