अभिनेत्री कंगना रणौतनं केलेल्या मुंबईबद्दलच्या विधानावरून उफाळून आलेला वाद अजूनही सुरूच आहे. कंगनाच्या विधानांवरून चर्चा सुरू असतानाच हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल भूमिका मांडली आहे. मात्र, अनुरागच्या भूमिकेचा संदर्भ देत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करतानाच मुंबई पोलिसांचीही भीती वाटत असल्याचं म्हटलं होतं. तिच्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद सुरूच आहे. कंगनानं याच विधानांना जोडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी केली. या वादात अनुराग कश्यपनं आपल्याला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं. उद्धव ठाकरे यांच्यामुळे माझी शिवसेनेबद्दलची मतंही बदलली, असं मत व्यक्त केलं.

अनुरागनं मांडलेल्या भूमिकेचा हवाला देत नितेश राणे यांनी टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेबाबतची मतं बदलली? म्हणजे बाळासाहेबाच्या शिवसेनेबाबत अनुराग कश्यपची मतं वेगळी होती? ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे. हे सगळं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निमुटपणे ऐकून घ्यायचं…,” असं निलेश राणे म्हणाले.

अनुराग कश्यप काय म्हणाला होता?

एका मुलाखतीत बोलताना अनुराग म्हणाला, “मी कोणाचीही बाजू घेत नाही. पण मला महाराष्ट्रात खरंच फार सुरक्षित वाटतं. येथे मी खुलेपणाने माझं मत मांडू शकतो. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टी घडत आहेत. त्या पाहून शिवसेनेबद्दलची माझी मतं पूर्णपणे बदलली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे हे घडलं आहे. मी उद्धव ठाकरे यांच्या मतांशी सहमत नसेलही, पण मला महाराष्ट्रात कायम सुरक्षित वाटतं. सध्या पाहायला गेलं तर केंद्र सरकार लोकांचं लक्ष खऱ्या मुद्द्यांवरुन बॉलिवूडकडे केंद्रित करत आहे. मी काँग्रेस समर्थक नाही, पण सध्या सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, त्याचा विरोध मी करत आहे,” असं अनुराग म्हणाला.